शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक येत्या २५ व २६ सप्टेंबर रोजी सांगोल्यात होणार आहे. त्याअनुषंगाने सांगोला शेतकरी सहकारी सूत गिरणीवर आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. कोरडे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या जनता विरुद्ध धोरणाच्या विरोधात आंदोलनाची आखणी व पक्षबांधणी या विषयावर कृती कार्यक्रमाविषयी पक्षाची भूमिका मांडली.
या दोन दिवसीय बैठकीत महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका पातळीवर अनेक स्थानिक समस्या आणि अडचणी त्या समस्याची सांगड देश व राजव्यापी प्रश्नांची यादी काढून स्वतंत्रपणे तसेच समविचारी पक्ष संघटना सोबत घेऊन संयुक्तपणे जनाधार उभारण्याबाबत चर्चा होणार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन शेतकरीविरोधी कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या नऊ महिन्यांपासून राजधानी नवी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. शेतकरी विरोधी तीनही कृषी कायदे मागे घ्या, रद्द करा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
या पत्रकार परिषदेला चिटणीस मंडळ सदस्य प्रा. शैलेंद्र मेहता, जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख, तालुका चिटणीस विठ्ठलराव शिंदे, ज्येष्ठ नेते बाबा करांडे, प्रा. नानासाहेब लिगाडे, डॉ. बाबासाहेब देशमुख, जि. प. सदस्य ॲड. सचिन देशमुख, दादाशेठ बाबर, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, माजी सभापती बाळासाहेब काटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संगम धांडोरे पंचायत समिती सदस्य नारायण पाटील, दिगंबर शिंगाडे, सीताराम सरगर, पुरोगामी युवक संघटना तालुकाध्यक्ष दीपक गोडसे, प्रा. सुब्राव बंडगर, मायाप्पा यमगर, अजित गावडे, नीलकंठ लिंगे, डॉ. दादा जगताप, प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत सरतापे, चिदानंद स्वामी आदी उपस्थित होते.
----
भारत बंदची हाक
या आंदोलन कारी शेतकऱ्यांच्या संयुक्त किसान मोर्चाने २७ सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. कामगार संघटनांनी लढून मिळवलेले ४४ कामगार कायदे रद्द करून लागू केलेल्या ४ कामगारविरोधी श्रम संहिता रद्द कराव्यात, अशी मागणी केली आहे. तसेच टेंभू, म्हैसाळ उपसा सिंचन योजना, सांगोला शाखा प्रकल्प ४ आणि ५ ची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी पोहोच करण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाने हाती घेतल्याचे ॲड. राजेंद्र कोरडे यांनी सांगितले.
---
मी नाराज आहे हे खरे!
शेकापचे ज्येष्ठ नेते बाबा करांडे यांच्या पुढाकाराने शेकापच्या मध्यवर्ती समितीची दोन दिवसीय बैठक सांगोल्यात ठेवली आहे. दरम्यान करांडे नाराज असल्याने पक्षाला लाल सलाम करून इतर पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. त्यावर त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत मी नाराज आहे, हे खरे आहे. मात्र, प्रकृती अस्वस्थतेमुळे मला पूर्वीसारखे पक्षाचे काम करता येणार नाही. मात्र, मी पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.