सोलापूर : शहरात सातत्याने होणाºया वातावरणातील बदलांमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हवेतील गारवा, आर्द्रता आणि मध्येच जाणवणारी उष्णता आणि धुळीचे कण यामुळे संसर्गजन्य आजारांचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यापासून दुपारी कडक ऊन, संध्याकाळी ढगाळ आणि रात्री थंडी अशा वातावरणामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
सर्दी, ताप आणि खोकल्याने अनेकजण बेजार आहेत. त्यामुळे क्लिनिकमध्ये रूग्णांची गर्दी दिसून येत आहे. सध्याचा कोरोना काळ असल्यामुळे अनेकांना या महामारीच्या संसर्गाचीही भीती वाटत आहे. मात्र सर्दी खोकला झाला म्हणजे कोरोना झाला नसल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले. मात्र तीन दिवसापेक्षा जास्त काळ हा आजार राहिला तर त्वरित टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले.
सध्या सकाळच्या सत्रात कधी थंडी जाणवते तर कधी उकाडाही जाणवतो. अनेकांना हवामान बदलामुळे सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत आहे. ही लक्षणे किरकोळ असली तरी यातून अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण होत आहे. कमी वेळेत झालेल्या हवामानातील बदलांमुळे हवेतील विषाणूंच्या वाढीसाठी पोषक स्थिती निर्माण होते त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढले आहे.
मुलं अन् ज्येष्ठांना त्रासकोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे सर्दी, खोकल्याचे ही रुग्ण वाढत आहेत. वातावरणातील बदलामुळे बालकांसह नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. विशेषत: लहान मुलांना,ज्येष्ठ नागरिकामध्ये सर्दी, खोकल्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामधील बहुतांश रुग्ण हे व्हायरल फिव्हरचे आहेत.
वातावरणातील बदलांमुळे शरीराचे तापमान स्थिर राहत नाही. त्यातून शहरात सध्या थंडी, ताप, सर्दी, खोकला अशा रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. यावेळी प्रतिकारशक्ती कमी होऊन, विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. तीन दिवसापेक्षा जास्त काळ हे आजार असतील तर तातडीने टेस्ट करून घ्या.- डॉ. विशाल गोरे