सोलापूर : पहाटे रिमझिम पाऊस, दिवसभर हवेत गारवा, सायंकाळी थंडी अशी रूतुमाने सोलापूरकरांना पाहावयास मिळत आहेत़ या बदलत्या वातावरणाचा प्रभाव लहान मुलांवर सर्वाधिक पडू लागला आहे़ हवामान बदलामुळे लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, चिकुनगुन्या, डेंग्यू, निमोनिया, अस्थमा, कफ आदी आजारांचे प्रमाण वाढले आहे़ या बदलत्या हवामानात पालकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या पाल्याच्या तब्येतीची वेळेत काळजी घ्यावी व आपल्या पाल्यांना सुदृढ, निरोगी ठेवावे, असे आवाहन प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ़ अतुल कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केले आहे़
पावसाळा आणि आॅक्टोबर हीटनंतर आता हिवाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली असतानाच सोलापुरात मागील दोन ते तीन दिवसांपासून पडणाºया रिमझिम पावसामुळे सोलापुरातील हवामानात बदल झाला आहे़ या बदलत्या हवामानामुळे लहान मुले आजारी पडत आहेत.
ऐन थंडीच्या मोसमात अचानक पाऊस पडत असल्याने लहान मुलांसह ज्येष्ठांपर्यंतच्या लोकांचे आरोग्य बिघडत चालले आहे़ त्यामुळे सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील सर्वच रुग्णालये सध्या हाऊसफुल्ल दिसून येत आहेत.
हिवाळा म्हणजे शरीर तंदुरूस्त राहण्याचा महिना मानला जातो़ या महिन्यात शरीरात अनेक बदल होत असतात. प्रामुख्याने लहान मुलांची विशेष काळजी पालकांनी घ्यायला हवी़ ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे लहान मुलांमध्ये दिसताच त्वरित डॉक्टरांना दाखवा़ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत़ बदलत्या हवामानात पालकांनी आपल्या पाल्यांची काळजी घ्यावी. डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी आपल्या परिसरातील दूषित पाणीसाठे नष्ट करा, थंडी व पावसापासून लहान मुलांचा बचाव करा, असेही आवाहन डॉक्टरांनी केले आहे़
चिकुनगुन्या रूग्णांच्या संख्येत होतेय वाढ- मागील दहा ते पंधरा दिवसांपासून सोलापूर शहरात चिकुनगुन्याच्या रूग्ण संख्येत वाढ होताना पहावयास मिळत आहे़ ताप येणे, अंगावर पुरळ येणे, अंग दुखणे आदी लक्षणे असलेले रूग्ण वाढत आहेत़ वेळीच दखल घेऊन संबंधित डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घ्यावेत़ चिकुनगुन्या हा तीन ते चार दिवसात बरा होणारा आजार आहे. त्यामुळे रूग्णांनी भीती बाळगू नये, असेही आवाहन डॉ़ अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.
अशी घ्या काळजी...
- - बदलत्या हवामानानुसार लहान मुलांच्या खाण्या-पिण्यातही बदल करा. मुलांना उकळून गार केलेले पाणी पिण्यास द्या
- - हिवाळ्यात मुले पाणी पिण्याचे नखरे करतात. शरीरास योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्याने त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे मुलांना दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने पाणी पाजले पाहिजे.
- - मुलांचे थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून उबदार कपडे परिधान करणे गरजेचे आहे.
- - हिवाळ्याच्या दिवसांत लहान मुलांना ऊब मिळेल असे कपडे घाला. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं शक्यतो घ्या.
हिवाळ्याची चाहूल लागताच लहान मुलांच्या खाण्या-पिण्यापासून तर त्यांच्या कपड्यापर्यंत बदल होत असतो़ मुलांना आंबट व थंडगार पदार्थ खाण्यास देऊ नये. हिवाळा म्हणजे तब्येत कमावण्याचा ऋतू आहे. त्यामुळे लहान मुलांच्या दररोजच्या आहारात सुकामेवा, फळ, दूध आदींचा समावेश करावा. लहान मुलांना कोमट पाण्याने अंघोळ घालून, कपडे परिधान करुन पुन्हा उन्हात बसवावे. त्याने 'ड' जीवनसत्व मिळते़- डॉ़. अतुल कुलकर्णी,बालरोग तज्ज्ञ.