सोलापूर : दिवाळीनंतर दुसऱ्या लाटेचा इशारा राज्य आरोग्य विभागाने दिला असल्याने जिल्हा आराेग्य विभागातर्फे खबरदारी घेण्यात येत आहे. पण सद्यस्थितीत थंडी कमी झाल्याने ग्रामीण भागात रुग्णवाढीचा वेग मंदावला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी "लोकमत" शी बोलताना दिली.
दिवाळीत बाजारपेठेत गर्दी झाली. सणामुळे नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर प्रवास केला. अशात मध्यंतरी थंडी सुरू झाली होती. त्यामुळे इतर देश व दिल्लीतील परिस्थितीमुळे महाराष्ट्रातही कोरोनाची दुसरी लाट येईल, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. सध्या चाचण्या दुप्पट करण्यात आल्या आहेत. मात्र त्या मानाने पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण बरेच कमी दिसत आहे. थंडी वाढली तर रुग्ण वाढतील, अशी शक्यता गृहीत धरून आरोग्य विभाग सज्ज आहे, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.
बदलत्या हवामानाचा आरोग्याला फटका बसत आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडी वाढली. पुन्हा ढगाळ हवामान निर्माण झाल्याने थंडीचा प्रभाव कमी झाला. कारखाने सुरू झाले. सुगीचा हंगाम आहे. वाहतूक वाढल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे घशाचे इन्फेक्शन, सर्दी, पडसे असा त्रास सुरू झाल्याचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणताही त्रास होऊ दे वेळीच उपचार घ्यावेत. घशाचे इन्फेक्शनचे रूपांतर पुढे ताप, न्यूमोनियामध्ये होते. त्यामुळे सर्वांनी मास्क वापरावा व गर्दीत जाणे टाळावे.
- ग्रामीणमधील कोरोनाची स्थिती
- रुग्ण बरे झाले: ९२.६ टक्के
- पॉझिटिव्ह दर: ११.२
- मृत्यूदर : २.९५
- रुग्ण दुप्पट कालावधी: १८३ दिवस
- असे वाढले रुग्ण व मृत्यू
- महिना रुग्ण मृत्यू
- मार्च ०० ००
- एप्रिल ०२ ००
- मे ३८ ०५
- जून ३२१ १३
- जुलै ३२९२ ९९
- ऑगस्ट ७८६८ २४७
- सप्टेंबर १३५०३ ३६०
- ऑक्टोबर ५९९७ १९३
- नाेव्हेंबर ३५२९ १०१