अंजनडोह येथील जयश्री दयानंद शिंदे (वय ३०) ही महिला शेतातील लिंबू तोडण्यासाठी गेली असता सायंकाळी परत आली नाही. तिचा शोध घेतला असता शेतात त्या महिलेचे केवळ मुंडके आढळून आले. यानंतर वनविभागाचे अधिकारी व गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली असता रात्री उशिरा रक्तबंबाळ मृतदेहही सापडला.
आष्टी (जि.बीड) येथे तिघांवर जीवघेणा हल्ला करून पळालेला बिबट्याच करमाळा तालुक्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी लिंबेवाडी (रावगाव) येथे ज्वारीस पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या कल्याण फुंदे यांच्यावर हल्ला करून ठार केले होते. तो नरभक्षक बिबट्याच असल्याचा निर्वाळा वनसंरक्षक एस. आर. कुर्ले यांनी दिला आहे.
गुरुवारी बिबट्याच्या या दहशतीमुळे तालुक्यातील लोकांनी धास्ती घेतली आहे. कामावर कोणी जाण्यास धजावत नाही. या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांनी आपल्या वस्तीत घराजवळ बिबट्याने आश्रय घेऊ नये म्हणून सायंकाळ होताच बिबट्याच्या भीतीने फटाके फोडले जात आहेत. वस्त्यांसमोर मोठे विजेचे दिवे लावून झगमगाट केला जात आहे. कोरोनापेक्षाही जास्त भीती बिबट्याची वाटू लागली आहे.
सोलापूर, अहमदनगर,बीड व पुणे विभागातील वन विभागाचे पथक रावगाव परिसरातील रानोमाळ दिवसभर बिबट्याच्या शोधासाठी फिरले तरी त्याने चकवा दिला. शेतकरी स्वत:च्या जीवाबरोबर गाय,वासरे, शेळ्या, बैल आदी पशुधनाला धोका होऊ नये म्हणून काळजी घेत आहेत.
-----
करमाळा तालुक्यात बिबट्याने हल्ला करून दोघांना ठार केले आहे, ही घटना गंभीर असून नरभक्षक बिबट्यास संपविण्याची गरज असून बीड जिल्ह्यात बिबट्या दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश राज्य वनपरिक्षेत्र अधिकारी कपोडकर यांनी दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यातील नरभक्षक बिबट्यास गोळ्या घालण्याचे आदेश द्यावेत.
आ. संजयमामा शिंदे,करमाळा.