गेल्या पंधरा दिवसांपासून गावपातळीवरील कार्यकर्त्यांचे बैठकीचे सत्र सुरू होते. अखेर सोमवारी सकाळी ९ वाजता नुरंदेश्वर महाराजांच्या मठात महाराजांच्या साक्षीने गावकरी ऐतिहासिक निर्णय घेत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला गावातील सर्व समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक समाजातील उमेदवाराला न्याय देण्यात आल्याने गावकऱ्यांनी, पंचांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.
यंदा पहिल्यांदाच हंजगी गाव बिनविरोध होत असल्याने गावकऱ्यांमध्ये एकीचे बळ निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. ग्रामपंचायत निवडणुकीचा निर्णय बिनविरोध झाल्याने सर्व गावकऱ्यांनी गळाभेट घेऊन आनंद व्यक्त केला. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावाला पंधरा लाख रुपये विकास निधी मिळत असल्याने गाव बिनविरोध काढण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आजपर्यंत गावपातळीवरील प्रत्येक ग्रामपंचायत निवडणूक चुरशीने होत होत्या. यामुळे गावात वादविवाद, संघर्ष उफाळून येताना दिसून येत असे. आता ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढण्याचा निर्णय झाल्याने गावातील तरुणापासून ते वयोवृद्धामध्ये उत्साह संचारला आहे. यासाठी गावातील प्रतिष्ठित ११ लोकांची कमिटी नियुक्त केली होती.
गाव बिनविरोध काढण्यात सरपंच उमेश पाटील, माजी सरपंच शिवयोगी बाणेगाव, तंटामुक्त अध्यक्ष बसवराज पाटील, अंबण्णा कोळी, महिबूब हुपळे, गुरुबसप्पा हचडे, प्रकाश कुंभार, शिवप्पा कोळी, संतोष म्हमाणे, परमेश्वर कुंभार,जहांगीर नदाफ, सोमनाथ कुंभार, प्रभानंद ख्यादे व प्रतिष्ठित नागरिकांनी परिश्रम घेतले.
-----
फोटो ओळ
अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील नुरंदेश्वर महाराजांच्या मठात सर्वधर्मीय लोकांनी एकत्रित येत गाव बिनविरोध काढण्यासाठी निर्णय घेतला.