१२वीच्या बोर्डाने नियोजित वार्षिक परीक्षा वेळापत्रकही जाहीर केलेले आहे. यामुळे येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना व नगरपालिकेच्या शिक्षण सभापतींना त्वरित शिक्षक भरण्याची लेखी निवेनाद्वारे मागणी केली आहे. ही मागणी करताच प्राचार्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत गणित विषयाचा एक कंत्राटी शिक्षक भरती करीत असल्याचे आश्वासन दिले आहे.
नगरपालिकेच्या महात्मा फुले सायन्स कॉलेजमध्ये ११वी व १२वीच्या प्रत्येकी चार-चार तुकड्या आहेत. अकरावी वर्गासाठी एकूण ४००, तर १२वीचेही ४०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. ११ वीच्या वर्गासाठी गणित हा विषय अनिवार्य आहे, पण यंदा बारावीतील सुमारे २५० विद्यार्थ्यांनी जीवशास्त्राऐवजी गणित हा विषय निवडलेला आहे. २४ एप्रिल ही परीक्षेची तारीखही बोर्डाने जाहीर केलेली आहे. त्यासाठी १५ डिसेंबरपासून त्याचे फाॅर्म भरण्याची प्रक्रियाही सुरू झालेली आहे. असे असतानाही कॉलेजमध्ये गणित विषयाचा शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागलेले आहे. गतवर्षी ११वी व १२वीच्या प्रत्येकी चार-चार तुकड्यांसाठी गणिताचे दोन शिक्षक कार्यरत होते, परंतु त्यातील एका शिक्षकाचे निधन झाले. त्यानंतर रिक्त भागा भरली गेली नाही. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्य भोसले व शिक्षण सभापती बागल यांना भेटून रिक्त जागेवर कंत्राटी शिक्षक तरी भरावा व विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष राहुल सुर्वे, शहराध्यक्ष सागर बंदपट्टे, शहर संघटक आकाश लांडे, उपाध्यक्ष गणेश चोैधरी, सरचिटणीस सोमनाथ पवार, सोमनाथ शिरगिरे, नागेश सादरे, रामभाऊ थोरात, बालाजी कदम उपस्थित होते.
कोट ::::::::
लॉकडाऊन काळात दोनपैकी एका गणित शिक्षकाचे निधन झाले. त्यानंतर दुसऱ्या शिक्षकांवर ती जबाबदारी आली. कोरोनामुळे कॉलेजच उशिरा भरलेले आहे. त्या जबाबदार शिक्षकाने कॉलेज भरायच्या अगोदरपासून संबंधित सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले आहे. आम्ही सर्वजण विद्यार्थ्यांबाबत दक्ष आहोत. रिक्त जागेवर एक कंत्राटी शिक्षकही भरलेला आहे. तो मंगळवारपासून कामावर येईल.
- उर्मिला बागल
सभापती, शिक्षण विभाग, नगरपालिका