माझी नववीची वार्षिक परीक्षा जाहीर झाली तसे घरातले सर्व वातावरण बदलून गेले. पुढचे दहावीचे वर्ष म्हणजे खूप मोठी जबाबदारी आली असे मला वाटू लागले. तसे आमच्या घरची स्थिती बेताचीच होती. क्लास लावण्याची ऐपत नव्हती आणि तसा मी काही बोर्डात वगैरे येणारा हुशार नव्हतो हे बाबांना पण माहीत होते. मी फक्त पास झालो तरी बस झाले हे सर्वजण जाणून होते आणि मला काही डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचे नव्हते. मला खरंतर सैनिक व्हायला आवडत होते कारण का ? तर सैनिक मी लहान असताना पाहिले होते. एकदा गावात एक जवान शहीद झाला होता. देशभरातून होणारं कौतुक पाहून वाटले आपणही असेच सैनिक व्हावे जेणेकरून लोक सलाम तरी करतील या उद्देशाने मी सैनिक व्हायचे ठरवले.
झाले. म्हणता म्हणता नववीचा शेवटचा पेपर झाला. शाळेतील शिक्षकांनी सांगितले पाच दिवस आराम करा आणि मग दहावीचे जादा क्लास सुरू होतील. मी घरी गेलो तेव्हा सर्वच नातेवाईक तळ ठोकून बसले होते. त्यात अधूनमधून शेजारी खूप सल्ले द्यायला येत होते. आज फुकट काय मिळतो तर सल्ला मिळतो हे पण मला कळून चुकले होते.
एका नातेवाईकाने बाबांना सांगितले ‘उद्यापासून टीव्ही कपड्यात गुंडाळून माळावर टाका. दुसºयाने सांगितले की याला वर्षभर अभ्यास करू देत. जागचे हलू देऊ नकोस, जे काय करायचे ते जागेवरच करू दे.! बाजूच्या मद्रासी काकांनी सांगितले की ‘त्याला मासे खाऊ घाल त्यामुळे हा चलाख होईल’ जोशी काकू म्हणाल्या ‘याला डिंकाचे लाडू करून दे .’ऐकाने तर सकाळी पाच किलोमीटर चालून आण बुद्धी फ्रेश राहते असे सांगितले. कोण म्हणाले ‘बदाम खाऊ घाल !
दुसºयाने सांगितले गादीवर झोपू देऊ नकोस, खूप आळस येतो मग अभ्यास कसे करणार? सतरंजी टाकून झोपव ! एका नातेवाईकाने मेंदूला रक्तपुरवठा चांगला होतो म्हणून शीर्षासन करायला सांगितले. आमच्या चुलत आत्याने जास्त जेवले की झोप लागते मग अभ्यास कसा काय करणार? त्यासाठी रात्रीचे जेवण बंद कर. हे सर्व बाहेरचे झाले पण घरच्यांनी तर कहरच केला होता. आजीचा तर जप चालू होता अभ्यास कर ! अभ्यास कर !
आईने बाबांना सांगितले याचे नाव गणेश आहे त्यामुळे तुम्ही गणपतीला अभिषेक द्या व मुलासाठी तुम्ही गणपतीचे उपास करा मी देखील नवरात्रीचे उपवास करते. सगळ्यांचे सल्ले! काही झाले नसताना फुकट मिळाले .जून महिना सुरू झाला. शाळा लवकरात लवकर सुरू होणार होती आणि यावेळेस प्रथमच फुल पॅन्ट घालून शाळेत जाणार होतो. अगोदर नववीपर्यंत हाफ पॅन्टवर काढले होते. पहिल्या दिवशी खूप आनंद वाटला. शाळेतून घरी आलो की लगेच शेजारचे भेटीला आले. खूप उपदेश केला फुल पॅन्ट बघून एकजण म्हणाला ‘आता तू काही लहान नाहीस घोडा झाला आहेस नीट वाग अभ्यास कर !’ ज्याने कधी हातात वही, पेन घेतले नाही तेव्हा तो म्हणाला १० वी फार डेंजर असते.
निदान एक-दोन तरी विषय काढ म्हणजे झाले ? देशपांडेकाका बाबांना म्हणाले याला सकाळी पहाटे चार वाजता उठून त्याला गार पाण्याने आंघोळ करून रोज मारुतीला १०१ प्रदक्षिणा घालायला सांग. सारखा सल्ला व उपचार यामुळे माझ्या हाडांचा नुसता साफळा झाला होता. पुस्तकाचे ओझे घेऊन जाणे म्हणजे मला वेगळीच कसरत करावी लागे. त्यातच शेजारची मुलगी मी शाळेला जाताना पाहून, जाताना आपल्या गलेलठ्ठ बहिणीला दहावीला आल्यावर आपोआप वजन कमी कसे होते. ते माझ्याकडे बोट दाखवून सांगत होती.
बघता बघता वर्ष कसे गेले कळले सुद्धा नाही. तीन दिवसानंतर दहावी बोर्ड परीक्षा सुरु होणार होती. आई व आजीने सांगितले उद्या शनिवार आहे. सोमवारपासून परीक्षा आहे तर उद्या मारुतीला १११ प्रदक्षिणा घाल शेवटचे. मी सकाळी उठून गार पाण्याने आंघोळ करून कसेतरी मंदिरात जाऊन प्रदक्षिणा घातली, देवाला नमन केले व म्हणालो ‘देवा कसेतरी करून मला पास कर व मला या सर्वांपासून वाचव!’ लगेच आतून आवाज आला अरे गाढवा अगोदर अभ्यास कर !- हेमंत निंबर्गी (लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत)