धनगर समाज आरक्षण कृती समितीची पंढरपूर येथे बैठक झाली. या बैठकीनंतर आदित्य फत्तेपूरकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आरक्षण कृती समितीचे सदस्य परमेश्वर कोळेकर, शालिवाहन कोळेकर, पांडुरंग भेंकी, राजाभाऊ उराडे, सोमनाथ ढोणे, पंकज देवकते, बालाजी येडगे, संजय लवटे, अण्णा सलगर, डॉ. मारुती पाटील, प्राचार्य संतोष शेंडगे, पांडुरंग चौगुले, संतोष सुळे, अंकुश पडवळे, विष्णू देशमुख, महेश येडगे, संतोष बंडगर आदी समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी फत्तेपूरकर म्हणाले, महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी फार मोठे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलविण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामध्ये घटना दुरुस्ती करण्याची चर्चा सुरू आहे. या अधिवेशनामध्ये धनगर समाजाचा ७० वर्षांपासूनच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. मुख्यमंत्र्यांनी ‘धनगड’ची ‘धनगर’ अशी दुरुस्ती करून केंद्राकडे अहवाल पाठवावा. धनगर समाजाला न्याय द्यावा. आषाढी एकादशीच्या महापूजेला मुख्यमंत्री येणार आहेत. आषाढी एकादशीच्या पूजेला येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या महापूजेला धनगर समाज विरोध करणार असल्याचे फत्तेपूरकर यांनी म्हटले आहे.
शिष्टमंडळ छत्रपती संभाजीराजेंना भेटणार
मराठा आरक्षणाबरोबरच धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, या मागण्यासाठी धनगर समाजाचे शिष्टमंडळ छत्रपती संभाजीराजेंना भेटणार आहे. त्याचबरोबर छत्रपती उदयनराजे महाराज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचीही शिष्टमंडळ भेट घेणार आहे.
फोटो :१६ पंढरपूर०१
पंढरपूर येथे धनगर आरक्षण कृती समितीच्या बैठकीत चर्चा करताना धनगर समाजबांधव.