सोलापूर : राज्यात आतापर्यंत ५५३ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले असून २३० कृषी फीडर्सवर एक लाख शेतकऱ्यांना पंपासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, रात्री-अपरात्री शेतात पिकांना पाणी देण्याचे काम करणे आता शेतकऱ्यांचे बंद होत आहे. यापुढील काळात संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार असल्याचे महावितरण प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना- २.०’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाचा शुभारंभ नुकताच पार पडला. या अभियानात सौर ऊर्जेचा वापर करून डिसेंबर २०२५ पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात किमान ३० टक्के कृषी फीडर्स सौरऊर्जेवर चालविण्यात येतील. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा व भरवशाचा वीजपुरवठा होईल. त्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होईल. राज्यात सध्या ४५ लाख कृषी पंपधारक शेतकरी वीज ग्राहक असल्याचेही महावितरण प्रशासनाने सांगितले.
या अभियानाच्या अंतर्गत राज्यात सौर ऊर्जेद्वारे ७००० मेगावॅट वीज निर्माण करून कृषी पंपांना पुरवठा करण्यात येईल. त्यासाठी राज्यात वीजनिर्मिती क्षेत्रात ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. ग्रामीण भागात हजारो रोजगार निर्माण होतील. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन भाड्याने देऊन हेक्टरी सव्वा लाख रुपये वार्षिक भाडे मिळविण्याची शेतकऱ्यांना संधी मिळणार आहे.