सोलापूर : छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीबाबत महावितरणने प्रभावी कामगिरी केली आहे. जुलै महिन्यापर्यंत महावितरणच्या १८ हजार ६८ ग्राहकांनी घराच्या, कारखान्याच्या, कचेरीच्या छतावर सोलर पॅनल बसवून तब्बल ८२ मेगावॅट विजेची निर्मिती केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वीजमंडळावर होणारा वाढता ताण आपोआप कमी होत चालला आहे.
दरम्यान, विजेच्या मागणीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चालली आहे. वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळश्याचा साठा सुद्धा अपुरा पडत चालला आहे. त्यामुळे पुढच्या येणाऱ्या काही काळात विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र सरकार ऊर्जा मंत्रालयाने रूफटॉप सौर प्रणाली योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऊर्जा मंत्रालयाने महावितरणला दुसऱ्या टप्प्यात जानेवारी २०२४ पर्यंत १०० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता रूफ टॉप सोलरच्या माध्यमातून निर्माण करण्याचे उद्दीष्ट दिले आहे. त्यापैकी सुमारे ८२ मेगावॅटची क्षमता कंपनीने जुलै महिन्यातच गाठली आहे व त्यातून १८,०६८ ग्राहकांना लाभ झाला आहे.
ग्राहकांना मिळतेय ४० टक्क्यांपर्यंत अनुदान
या योजनेअंतर्गत घरगुती, गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना यांच्या छतावर रूफटॉप सोलर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यात येत आहेत. यासाठी शासनाकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात आहे. या योजनेमुळे घरगुती वीज बिलात बचत होण्यास मदत होईल तर सौर ऊर्जेमुळे जास्तीची ऊर्जा नेट मीटरिंगद्वारे महावितरणाला विकता येत आहे. या योजनेअंतर्गत घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान १ किलोवॅट क्षमतेची छतावर (रूफटॉप) सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून टप्पा २ अंतर्गत वित्त सहाय्य अनुदान देण्यात येत आहे.