राजकुमार सारोळे
सोलापूर : एप्रिलअखेरपर्यंत कोरोनामुक्त राहिलेल्या जिल्ह्यात बाहेरून आलेल्या लोकांमुळे संसर्ग वाढला. तरीपण जिल्ह्यातील १0२९ गावांपैकी ६0९ गावांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाला वेशीवरच रोखून धरले आहे. जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणेला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी नियमांचे पालन केल्यामुळे हे शक्य झाल्याचे सरपंचाच्या प्रतिक्रियांवरून दिसून आले आहे.
सोलापूर शहरात मार्च महिन्यात रुग्ण आढळले, पण ग्रामीण भागात बाहेरून येणाºया प्रत्येक प्रवाशांना क्वारंटाईन करून आरोग्य तपासणीची मोेहीम कडकपणे राबविण्यात आल्यामुळे ग्रामीण भाग कोरोनामुक्त राहिला होता. शहरात हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांमुळे व मुंबई, पुणे व परदेशातून आलेल्या लोकांमुळे ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पहिला रुग्ण २४ एप्रिल रोजी आढळला. अनलॉकनंतर संपर्कामुळे रुग्ण वाढत गेले. १३ आॅगस्टपर्यंत ग्रामीण भागात ६७७२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर यापैकी १९४ जणांचा मृत्यू झाला आहे. ३८५० इतके रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ५६.८५ टक्के तर मृत्यूचे प्रमाण २. ८६ टक्के आहे. रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण १५ दिवसांवर आले आहे.
ग्रामीण भागाची अशी स्थिती असताना ६०९ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. लॉकडाऊन झाल्यापासून आरोग्य यंत्रणा सतर्क व ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. लॉकडाऊननंतर कामानिमित्त बाहेरगावी गेलेले अनेक ग्रामस्थ परतले. पण ग्रामस्थांनी त्यांना वेशीवर रोखून धरले. १४ दिवस शाळेत क्वारंटाईन होऊन आरोग्य तपासणी झाल्यावरच त्यांना गावात घेण्यात आले. यामुळे कोरोना विषाणूला दूर ठेवता आले आहे.
अनलॉक झाल्यानंतरही ग्रामस्थांनी या नियमांचे काटेकोर पालन सुरू केले आहे. फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर, गरज असेल त्यावेळीच अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीला बाहेर पडणे, सॅनिटायझर व हात धुण्यासाठी साबणाचा वापर केला जात आहे. प्रवास टाळणे व संसर्गबाधित गाव व शहराकडे न जाण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहेत. खरीप हंगाम सुरू झाल्यावर शेतकºयांनी घरगुती बियाणांवर भर दिला. बाजूच्या मोठ्या गावांतून बियाणे व खते आणताना काळजी घेतल्याचे दिसून आले.
कोरोनामुक्त गावेजिल्ह्यातील १0२९ गावांपैकी ६0९ गावे अद्याप कोरोनामुक्त राहिली आहेत. ४२0 गावांमध्ये शहरातून व पुणे, मुंबईच्या प्रवाशांकडून कोरोनाचा संसर्ग झाला.उत्तर तालुक्यातील गुळवंची, दक्षिणमध्ये निंबर्गी, सादेपूर, बाळगी, मंगळवेढ्यातील उचेठाण, बठाण, ब्रह्मपुरीचा समावेश आहे.
ग्रामस्थांची नियमित तपासणी व उपचारप्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाºयांनी दररोज गावात फेरफटका मारून जुने आजार असलेल्या लोकांची तपासणी, सॅनिटायझर, मास्कचे मोफत वाटप केले. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी रोगप्रतिकारक औषध व काढ्याचे वाटप केले. गरम पाणी व आहाराबाबत मार्गदर्शन केले
अंगणवाडी ताई, आशा वर्कर्सचा रोल कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यावर गावातील लोकांचे सर्वेक्षण, बाहेरून येणाºयांची यादी व त्यांना क्वारंटाईन करणे, जेष्ठ मंडळी, गरोदर व स्तनदा माता यांना वेळेत आहार पुरवठा केला. आशा वर्करनी पल्स आॅक्सिमीटरद्वारे तपासणी करून लोकांना रोग प्रतिबंधात्मक औषधे पोहोच केली.
आरोग्य सर्वेक्षणावर भरकोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यावर लोक घराबाहेर पडू नयेत याची काळजी घेतली. घरोघरी सर्वेक्षण करून आजारी लोकांची माहिती काढली. अशा लोकांना रोग प्रतिबंधात्मक औषधांचा पुरवठा केला. बाहेरून येणाºयांवर कडक लक्ष ठेवून शाळेत क्वारंटाईन केले. -प्रकाश वायचळ- सीईओ, जिल्हा परिषद