सोलापूर : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सिव्हिल हॉस्पिटलवर वाढलेला ताण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेने नेहरू वसतिगृहात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी कोविड हॉस्पिटल उभारण्याची तयारी सुरू केली आहे.
ग्रामीण भागात १६ एप्रिलअखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५५ हजार ९५१, तर मृतांची आकडा १ हजार ३६३ वर पोहोचला आहे. यातील ४७ हजार ७८७ जण कोरोनामुक्त झाले असले तरी अद्याप ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ हजार ८०२ इतकी आहे. पंढरपूर व बार्शी तालुक्यातील रुग्णसंख्येने दहा हजारांचा टप्पा केव्हाच पार केला आहे. ग्रामीणमध्ये मृतांचे प्रमाण वाढले आहे. अत्यवस्थ रुग्णांवर वेळेवर उचपार होण्यासाठी सोलापुरात झेडपीचे स्वतंत्र कोविड हॉस्पिटल असावे, अशी संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी मांडली आहे.
मुख्य लेखा अधिकारी अजयसिंह पवार यांनी हॉस्पिटल कसे असावे, यावर काम सुरू केले आहे. पवार यांनी पहिल्या लाटेत सोलापूर महानगरपालिकेकडे काम केले आहे. त्यामुळे त्यांना शहरातील स्थितीचा अंदाज असल्याने इतर डॉक्टरांच्या मदतीने हे कोविड हॉस्पिटल चालविण्याचा मानस आहे.
वस्तुत: जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सर्वांत मोठी आहे. जिल्ह्यात नगर पंचायत व नगरपालिका आहेत. त्यांच्याकडे ग्रामीण रुग्णालयाची यंत्रणा वगळता आरोग्य सेवा नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेवर आरोग्याचा मोठा ताण आहे. याही परिस्थितीत शहराकडे ग्रामीणमधून येणाऱ्या रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशी सध्याची अवस्था आहे. गरीब रुग्णांचे हाल होऊ नयेत व मृत्यूदर कमी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने वेळेत उपचार व्हावेत या उद्देशाने झेडपीच्या मालकीचे असलेल्या नेहरू वसतिगृहात हे हॉस्पिटल साकारण्यात येणार आहे. वसतिगृहात स्वतंत्र खोल्या व समोर मोठे मैदान आहे. त्यामुळे कोविड हॉस्पिटलसाठी येथे चांगली सोय होणार आहे.-
ऑक्सिजनसाठी थांबले काम
जिल्हा परिषदेचे शहरात एक कोविड हॉस्पिटल असावे, अशी मी संकल्पना मांडली आहे. त्यावर काम सुरू झाले आहे. नेहरू वसतिगृहात कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी ऑक्सिजनची काय सोय करता येईल, हे तपासले जात आहे. ही सोय झाल्यानंतर वेगाने हाॅस्पिटलची उभारणी करण्यात येईल व सर्व व्यवस्था करण्यात येईल.
- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी-
अशी आहे झेडपीची आरोग्य यंत्रणा
ग्रामीण लोकसंख्या३२ लाख ६४ हजार
प्राथमिक आरोग्य केंद्र७७
प्राथमिक उपकेंद्र४२७
ग्रामीण रुग्णालय१४
उपजिल्हा रुग्णालय३