सोलापूर : सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घराच्या बाहेर निघणे हे खूप धोकादायक ठरत आहे. यामुळे शासनाच्या वतीने घराच्या बाहेर न निघण्याचे आवाहन करण्यात येत आहे; पण यामुळे ज्यांना आरोग्याचे प्रश्न उद्भवत आहेत. अशा रुग्णांना मात्र अडचणीचे ठरत आहे. सर्दी, डोकेदुखी, पोटदुखी अशा आजारांच्या रुग्णांसाठी डॉक्टरांच्या वतीने फोनवरून मोफत सल्ला देण्यात येत आहे. दिवसाकाठी शेकडो रुग्णांना फोनमधून सल्ला देण्यात येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरासह देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे काही वेळेपुरतेच दवाखाने उघडे असतात; पण यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या वतीने फोनवरून रुग्णांना सल्ला दिला जात आहे. काहीवेळा डॉक्टर हे रुग्णांना औषधे हे मेसेजव्दारे पाठवतात तर काही वेळेस त्यांना मेडिकलमधून फोन करण्यास सांगून औषधे दिली जातात. सल्ला देताना रुग्ण आपल्या ओळखीचा आहे का त्यानुसार त्यावर उपचार केले जातात. यावेळी काही साधारण आजाराचे लक्षण असणाºयांनाच फोनमधून औषधांचा सल्ला दिला जातो.
सर्वांना मोफत सल्ला- सध्या दिवसाकाठी एका डॉक्टरांना पंधरा ते वीस फोन येत असतात. त्या सर्वांना मोफत सल्ला दिला जातो. दररोज साधारणत: सर्दी, पोटदुखी, डोकेदुखी अशा आजारांचे डॉक्टरांना फोन येत आहेत. अशा रुग्णांना डॉक्टर हे फोनमधूनच सल्ला देतात व ज्या रुग्णांना प्रत्यक्षात पाहणे गरजेचे असते त्या रुग्णांना मात्र त्यांच्या घराजवळील क्लिनिकमध्ये दाखवण्याचा सल्ला दिला जातो.
गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून फोनव्दारे रुग्णांना सल्ला देण्यात येत आहे. यामुळे रुग्णांची सोयही होत आहे.यासाठी निमा संघटनेच्या २२ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते फोनव्दारे रुग्णांना सल्ले देतात. प्रत्येक डॉक्टरांना दिवसाकाठी जवळपास वीस फोन येत असतात. त्या सर्वांना मेसेजव्दारे औषधे दिली जातात.- डॉ. विनायक टेंभुर्णीकर, राष्ट्रीय अध्यक्ष निमा
माझे क्लिनिक हे दररोज उघडत असतो; पण यानंतरही रुग्णांना काही त्रास होत असल्यास त्यांना फोनवरून सल्ला दिला जातो, यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी आहे. याचा खूप मोठा फायदा आहे. यामुळे रुग्णांचा त्रासही लवकर बरा होण्यास मदत होत आहे.- डॉ. रुपेश येडके