सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात बुधवारी मंद्रुप, भंडारकवठे आणि बक्षीहिप्परगे येथे प्रत्येकी एक याप्रमाणे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गायकवाड यांनी दिली.
मंद्रुप गावात आत्तापर्यंत ० रुग्ण होते. यापूर्वी आढळलेला एक पोलीस व डॉक्टराचा मुलगा मंद्रुपमध्ये राहावयास नव्हते. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला होता. पण दोन दिवसापूर्वी गावातील एका ६९ वर्षीय वृद्धास सर्दी खोकला व ताप आल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्या वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मंद्रुप गावात आता खबरदारी घेण्यात येत आहे. गावामध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचे समजताच बाजारपेठेतील दुकाने पटापट बंद करण्यात आली.
त्याचबरोबर भंडारकवठे येथील एका ६५ वर्षीय महिलेला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केले असता तिचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बक्षीहिप्परगा येथील ७० वर्षाची वृद्धा यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने तिलाही लागण झाली आहे. विशेष म्हणजे ११४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत, त्यामध्ये मुळेगाव येथील ४५ तसेच वांगी वडापूर, शंकरनगर, बसवनगर, कुंभारी, विडीघरकुल येथील ६० रुग्णांचा समावेश आहे.