सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू असून, याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून काही नवे निर्बंध लागू केले आहेत. यात परजिल्ह्यातून सोलापुरात येणाऱ्या नागरिकांवर ‘वॉच’ ठेवण्याच्या सूचना आहेत. परजिल्ह्यातून सोलापुरात येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर चौदा दिवसांचा होम क्वारंटाईनचा शिक्का मारावा. तशी यंत्रणा संबंधितांनी उभी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
कडक लॉकडाऊनच्या काळात एका शहरातून दुसऱ्या शहरात अथवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नवे नियम लागू असतील. तसेच खासगी वाहनांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा अथवा कामाशिवाय प्रवास करणाऱ्यांवरही कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. विनापरवाना प्रवास करणाऱ्यांना दहा हजारांचा दंड आकारला जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनालाही तेवढाच दंड होईल. प्रवासी थांब्यावर उतरल्यानंतर संबंधित बस ऑपरटेरने प्रवाशाच्या हातावर १४ दिवस होम क्वारंटाईनचा शिक्का मारणे बंधनकारक आहे. तर त्याचठिकाणी त्या प्रवाशाची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात येणार असून, तशी व्यवस्था त्याठिकाणी उभारावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या आहेत.
..............
असे आहेत नवे नियम
- विवाह दोन तासात उरका, फक्त पन्नास लोकांनाच परवानगी
- नियम मोडल्यास मंगल कार्यालयाला ५० हजारांचा दंड
- दंडासोबत मंगल कार्यालय होईल सील
- पाच अथवा त्याहून कमी कर्मचारी असलेली सरकारी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील
- खासगी वाहनात ५० टक्केच प्रवासी असतील; नियमाचा भंग केल्यास दहा हजारांचा दंड
- परजिल्ह्यातून सोलापुरात येणाऱ्या प्रवासी तसेच नागरिकांच्या हातावर १४ दिवसांचा होम क्वारंटाईनचा शिक्का बसेल
- सोलापुरात उतरल्यानंतर प्रवाशांची कोरोनाची रॅपिड अँटिजेन चाचणी होईल