सोलापूर : सोलापूरच्या पालकमंत्री पदी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा सोमवारी सोलापूरकरांना पहिलाच मेसेज मिळाला आहे. लवकरच सोलापूर दौरा करणार आहे. दौरा दरम्यान कुणीही फटाके उडवू नये. गुलाल उधळू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच भेटीत पुष्पहार किंवा पुष्पगुच्छ टाळावा, असा मेसेज त्यांच्याकडून सोलापूरकरांना मिळाला आहे.
४ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची सुधारित यादी प्रसिद्ध केली. सोलापूरच्या नवीन पालकमंत्री पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती झाली. त्यांच्याकडे अमरावतीचाही भार आहे. त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा अद्याप सोलापूर दौरा झालेला नाही. विनंती करणारे मेसेज त्यांच्याकडून मिळाल्याने लवकरच त्यांचा दौरा होणार असल्याची माहिती अधिकारी देत आहेत.