सोलापूर : मिळकतदारांनी मिळकतकरावरील शास्ती माफीचा लाभ 15 डिसेंबर पर्यंत घ्यावा. मुदतीनंतर बड्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात येईल अशी महिती महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिला आहे.
महापालिकेच्या वतीने शहर व शहर हद्दवाढ विभागातील ज्या मिळकतदारांची थकबाकी आहे, अशा मिळकतदारांची नोटीस फी, वारंट फी व शास्ती फी ८० टक्के माफ करण्यासाठी विशेष अभय योजना राबविण्यात आलेली आहे. त्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आणखी आठ दिवस बाकी राहिले असून या मुदतीत थकबाकी भरून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले यांनी केले आहे. मुदतीनंतर बड्या थकबाकीदारांवर महापालिकेच्या वतीने जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, महापालिकेतील मिळकतकर वसुली विभागाची अधिकारी व निरीक्षक यांची बैठक घेतली. यामध्ये कर वसुली व थकबाकी यांचा आढावा घेण्यात आला. थकबाकी असलेल्या खाजगी शिक्षण संस्थांसह मोठ्या थकबाकीदारांविरुद्ध सील व जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईसाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. सुरुवातीला मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतरांवर कारवाई हाती घेण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.