साेलापूर : राज्य सरकारने साेमवारी रात्री अनलाॅकची नवी नियमावली जाहीर करताना, शहर आणि ग्रामीण भागातील निर्बंध कायम ठेवले आहेत. शहरातील रुग्णसंख्या नगण्य आहे. मात्र ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढत असल्याचा फटका शहराला बसला आहे. रुग्णसंख्या घटल्याने शहरातील निर्बंध हटविण्यास परवानगी द्यावी, असे पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविणार असल्याचे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.
राज्य सरकारने साेलापूरसह १४ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांतील निर्बंध हटविले आहेत. उर्वरित २५ जिल्ह्यांत दुकानांची वेळ रात्री आठपर्यंत वाढविण्यात आली आहे. शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी आहे. ज्या भागात रुग्णसंख्या वाढत आहे, त्या भागात निर्बंध कायम राहतील, असेही सरकारने स्पष्ट केले. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील निर्बंध हटविण्याचे अधिकार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. शहरात जुलैपासून निर्बंध आहेत. काेराेनाचा प्रादुर्भाव आटाेक्यात आहे. शहराचा जुलै महिन्यातील पाॅझिटिव्हिटी रेट एक टक्क्याखाली हाेता. शिवाय ऑक्सिजन बेडची टक्केवारी सहा हाेती. ग्रामीण भागाचा पाॅझिटिव्हिटी रेट ८.३८ टक्के, ऑक्सिजन बेडची टक्केवारी १४ आहे. जून महिन्यात राज्य सरकारने ग्रामीण भागातील रुग्णवाढीचा आलेख पाहून शहरातील निर्बंध कायम ठेवले हाेते. याविरुध्द व्यापाऱ्यांनी माजी आमदार दिलीपराव माने यांच्या नेतृत्वाखाली आंदाेलन केले हाेते. त्यानंतर राज्य सरकारने महापालिकेला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिली हाेती. महापालिका आयुक्तांनी शहरातील निर्बंध हटविले हाेते. आता सरकारने नवे आदेश जारी करताना साेलापूरला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिलेली नाही.
------
शहरात आढळले केवळ दाेन रुग्ण
शहरात गेल्या २४ तासात काेराेनाचे दाेन रुग्ण आढळून आल्याचे साेमवारी स्पष्ट झाले. गेल्या महिनाभरात शहरात दरराेज सरासरी पाच ते सहा रुग्ण आढळून येत आहेत. पुणे, मुंबई शहरात निर्बंध असले तरी, सर्रास दुकाने सुरू असतात. साेलापुरात मनपा, पाेलीस कारवाईच्या भीतीमुळे दुकानदार निर्बंध पाळतात.
काेराेनाचा शहरातील प्रादुर्भाव आटाेक्यात आहे. त्यामुळे येथील दुकानांची वेळ वाढविण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाकडे मंगळवारी तत्काळ पाठविणार आहाेत. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा करणार आहाेत.
- पी. शिवशंकर, आयुक्त, मनपा.