पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या निधीसाठी समिती सदस्य मुख्यमंत्र्यांना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 09:15 PM2021-09-03T21:15:46+5:302021-09-03T21:16:31+5:30

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

Committee members will meet the Chief Minister for funding the Punyashlok Ahilya Devi Holkar Memorial | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या निधीसाठी समिती सदस्य मुख्यमंत्र्यांना भेटणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या निधीसाठी समिती सदस्य मुख्यमंत्र्यांना भेटणार

Next

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी यांचा भव्य पुतळा व स्मारक निर्मितीसाठी एकूण नऊ कोटी निधीची आवश्यकता असून त्यातील दोन कोटी रुपये निधी विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. उर्वरित सात कोटी निधींच्या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुढील आठवड्यात भेट घेण्याचा निर्णय स्मारक समिती सदस्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

नियोजन भवन येथे पालकमंत्री तथा स्मारक समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती सदस्यांची बैठक पार पडली. बैठकीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू तथा स्मारक समितीच्या कार्याध्यक्षा डॉ. मृणालिनी फडणवीस, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त डॉ.वैशाली कडूकर यांच्यासह समितीचे सदस्य बाळासाहेब शेळके, चेतन नरोटे, आदित्य फत्तेपुरकर, डॉ. अनिकेत देशमुख, गेना दोडतले, श्रावण भवर, बाळासाहेब बंडगर, अस्मिता गायकवाड, ॲड. सुचेता व्हनकळसे, प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे यांची उपस्थिती होती.

कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी विद्यापीठात साकारण्यात येणाऱ्या अहिल्यादेवी यांच्या स्मारकासंदर्भात माहिती दिली. स्मारकासाठी विद्यापीठासमोर जागा उपलब्ध करण्यात आली आहे. याठिकाणी स्मारक, चबुतरा आणि ॲम्पीथेअटर असणार आहे. ॲम्पिथेअटरमध्ये डॉकुमेंटरीद्वारे अहिल्यादेवींच्या कार्याचा, शौर्याच्या इतिहासाचा आढावा घेतला जाणार आहे. विद्यापीठाच्या पत्रावरसुद्धा अहिल्यादेवींच्या फोटोचा लोगो करण्यात आला आहे. 

शासनाकडून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच स्मारकाचे काम 6 मार्च 2022 अथवा 31 मे 2022 पर्यंत पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार आहेत. जगाला अभिमान वाटावा आणि नव्या पिढीला आदर्श असे स्मारक उभारणार असल्याचे पालकमंत्री श्री. भरणे यांनी सांगितले.

बैठकीत समितीच्या सदस्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा हातात धरलेली शिवपिंडावरील पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण देशभरात अहिल्यादेवींचा फोटो हा हातात शिवपिंड धरलेला असून लोकांच्या मनात तोच फोटो परिचित असल्याचे मत सर्व सदस्यांनी व्यक्त केले. त्यामुळे एकमतांनी शिवपिंड हातात धरलेला अहिल्यादेवींचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. प्रभारी कुलसचिव डॉ. घुटे यांनी आभार मानले.

Web Title: Committee members will meet the Chief Minister for funding the Punyashlok Ahilya Devi Holkar Memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.