सोलापूर : हिंदू राष्ट्र येणार नव्हते तर ७९ वर्षीय महात्मा गांधींना मारुन काय फायदा झाला? उलट धर्म, जात आड न येता बंधुता आणण्याचा प्रयत्न झाला़ धर्माला राजकारणात ओढण्याचे काही कारण नाही़ तरीही ओढलं जातंय. लोकशाही टिकवायची असेल तर मोदींना घालवणे हाच सर्वसामान्यांचा अजेंडा राहील, अशी टीका युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केली.
मतदार जागृती परिषदेच्या वतीने हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटर येथे आयोजित केलेल्या ‘लोकशाही निवडणूक २०१९ आणि देशासमोरील आव्हाने’ या विषयावर डॉ़ सप्तर्षी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कार्यवाह संदीप बर्वे, माजी प्राचार्य नरेंद्र बदनोरे, अॅड़ गोविंद पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हेमू चंदेले यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘मन की बात’ ही मोदींची नव्हे तर हिटलर यांचीच होती, असा आरोप करून डॉ. सप्तर्षी म्हणाले, मतदारांनो शांत राहा, विचार करा, मतदानातून देशाची व्यवस्था सुधारायची आहे़ मतदानाची टक्केवारी वाढवायची आहे.
आजचे राजकारण हे चिखल झाले आहे आणि चिखलातच कमळ उगवते़ आज कमळ निवडून दिलात तर देशाचे भवितव्य अवघड आहे़ आज संविधानाला जोडून दुसरे संविधान आणू पाहत आहेत़ अभूतपूर्व घटना घडण्याचा काळ आणला आहे़ लोकशाहीला ग्रहण लावण्याचा प्रयत्न होतोय.
प्रास्ताविक अॅड़ गोविंद पाटील यांनी केले़ प्रा. बदनोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून लोकशाहीची सध्यस्थिती मांडत ती बळकट करण्यावर कसे प्रयत्न करता येतील यावर भाष्य केले.
सूत्रसंचालन बागवान यांनी केले तर आभार सुभाष शास्त्री यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने, रवींद्र मोकाशी, चंदुभाई देढिया, डॉ़ श्रीकांत येळेगावकर, केशव इंगळे यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते़