बंडोपंत कोटीवाले
वडवळ : दोघींचेही शिक्षण अल्पच. मात्र जीवन जगण्याची कला इतक्या खुबीने शिकल्या की त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटते की, या शिकल्या नसल्या म्हणून काय झालं, पण जीवनाचा धडा मात्र सुरेख रंगवीत आहेत. आज स्त्रिया शिकून सावरून सर्वच क्षेत्रात पुरुषांसोबत आघाडीवर कार्य करीत आहेत. मात्र कमी शिकलेल्या अन् खेड्यात राहूनही काही स्त्रिया आपल्या जागेतच नवीन विश्व निर्माण करीत आहेत. तिºहे (ता. उत्तर सोलापूर) येथील वनिता रामचंद्र खराडे या मोटरसायकल ते जेसीबीच्या चाकाचे पंक्चर काढतात व टायर वर्क्स व वॉशिंग सेंटरचा व्यवसाय समर्थपणे चालवीत आहेत.
सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावरील तिºहे येथे लक्ष्मी टायर वर्क्स व वॉशिंग सेंटर दिसते नेहमीच्याच दुकानासारखे दुकान ! पण इथे वनिता रामचंद्र खराडे (वय ३९) या मोटरसायकल ते ट्रक, जेसीबीचे पंक्चर झालेले चाक एकट्या खोलून पंक्चर काढतात अन् हाच त्यांचा व्यवसाय आता जोमात सुरू आहे. शिक्षण फक्त सहावी. पण पतीच्या व्यवसायात मदत करीत करीत आपल्याच घरचे काम आपण करायला लाज कसली? हे तत्त्वज्ञान त्या अनुभवातून शिकल्या अन् या व्यवसायात फक्त पुरुषच नाही तर स्त्रियादेखील अचूक काम करू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांना बाळासाहेब व लक्ष्मी ही दोन मुले आहेत. मुलगा दहावीत तर मुलगी बारावीत शिकते आहे. गेल्या आठ वर्षांपासून हा त्यांचा व्यवसाय सुरू आहे.
वडील बब्रुवाहन गणपत जाधव यांना जेव्हा समजले की, आपली मुलगी हे काम तिच्या पतीकडून शिकत आहे, तेव्हा सर्वप्रथम त्यांनी आनंदाने होकार दिला. ‘कष्टाचे काम करायला लाजू नको पोरी’, हा मंत्रच दिला. मात्र इतर पाहुणे व लोक हे नावे ठेवत होते. मात्र वनितातार्इंनी निर्धार पक्का ठेवला व आपले काम शिकत गेल्या. आज पती व पत्नी दोघेच हा व्यवसाय करीत आहेत. पती रामचंद्र काही कामानिमित्त दुकानात नसले तरी त्या एकट्याच दुकान सांभाळतात.
सुरुवातीला या व्यवसायासाठी काही आवश्यक साधनसामुग्री खरेदीसाठी पैशाची गरज निर्माण झाली, तेव्हा त्यांनी एका राष्ट्रीयीकृत बँकेत कर्ज मागितले. मात्र तिथे त्यांचे शिक्षण, तारण आदी गोष्टी पाहून कर्ज दिले नाही, पण एवढ्यावर नाराज न होता त्यांनी सावकारी कर्ज काढले आणि व्यवसाय सुरू केला. आज मात्र स्वत: जागा विकत घेऊन सर्व साधनसामुग्रीसह व्यवसाय थाटाने सुरू आहे. वाहने धुण्याकरिता वॉशिंग सेंटर आहे. वीज गेल्यास जनरेटर आहे. वाहनांचे किरकोळ स्पेअर पाटर््स आहेत. अवजड वाहनांची कामे वनिताताई आपल्या कष्टाच्या हाताने सोपी करीत आहेत.
मी शिकले नाही, म्हणून काय झाले, पण जिद्द सोडली नाही. आपल्या कष्टाने आपण कोणताही धंदा यशस्वी करू शकतो. मी, माझ्या या धंद्यावर समाधानी आहे. महिलांनी न लाजता, न घाबरता पुढे यायला पाहिजे. - वनिता खराडे, तिºहे