प्रभू पुजारी ।
पंढरपूर : राज्यात काँगे्रस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून विद्यमान आ़ भारत भालके यांची उमेदवारी फिक्स मानली जात आहे़ झेडपी सदस्या शैला गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश करून आपल्यालाच उमेदवारी मिळणार हे गृहीत धरून त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे़ भाजपकडून परिचारक की आवताडे याचा फैसला अजून झालेला नाही़ असे असले तरीही आवताडे आणि परिचारक दोघांनीही निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसून येते.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला आहे़ शैला गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वरिष्ठ पातळीवरून उमेदवारी फिक्स करून निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे़ त्यांनी मंगळवेढा तालुक्यात होम टू होम भेटीचा पहिला टप्पा पूर्णही केला आहे़ गत निवडणुकीत शिवसेनेकडून लढलेले समाधान आवताडे हे सध्या तरी ‘तळ्यात-मळ्यात’ आहेत़ असे असले तरी त्यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे़ मंगळवेढा ‘होम पिच’ असल्याने त्याकडे जास्त लक्ष न देता त्यांनी पंढरपुरात संपर्क कार्यालय तसेच नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून तरुण वर्ग आणि नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
परिचारक गटाचे पंढरपूर तालुक्यात प्राबल्य आहे. त्यामुळे आ़ प्रशांत परिचारक, युटोपियनचे चेअरमन उमेश परिचारक यांनी युटोपियनच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यातील शेतकºयांची मते अजमावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे़ शिवाय मंगळवेढ्यातील विविध कार्यक्रमास हजेरी लावून नागरिकांना आपल्या गटाकडे वळविण्याचा खटाटोप सुरू केला आहे़ आ़ भारत भालके यांची जन्मभूमी पंढरपूर असली तरी मंगळवेढा तालुकाच त्यांना तारु शकतो़ ही बाब त्यांच्या लक्षात आल्याने ती कर्मभूमी मानून त्या तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांचा पाणीप्रश्न, ४५ गावांतील नागरिकांची कोरडवाहू गावे म्हणून जाहीर करण्यासाठीची मागणी असेल, याकडे विशेष लक्ष दिले आहे़ काही दिवसांपूर्वी त्यांना मंत्रीपदाचे आश्वासन दिल्याने आ़ भारत भालके हे हॅट्ट्रिकसह मंत्रीपद मिळविण्यासाठी खटाटोप करताना दिसत आहेत़
युती झाली तर मोठा तिढा?- राज्यात सध्या भाजपा-शिवसेनेची युती आहे़ मात्र आगामी निवडणुकीसाठी काय होईल हे सध्या गुलदस्त्यात आहे़ सध्या या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून शैला गोडसे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे़ मात्र भाजपाकडून परिचारक की आवताडे? याबाबत संभ्रम आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी परिचारक यांनी विधानपरिषदेवर कायम राहावे आणि आवताडे यांना जागा द्यावी याबाबत चर्चा करण्याचा सल्ला दिल्याचे समजते़ युती झाली तर मोठा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे़