आजचं युग हे स्पर्धेचे युग आहे हे सत्य आहे. कारण प्रत्येक ठिकाणी स्पर्धाच करावी लागत आहे. हेही खरंय पण स्पर्धेत टिकण्यासाठी आमच्याकडं नेमकं काय हवं ते माहिती असावं. पहिली गोष्ट स्वत:वर प्रचंड विश्वास असायला हवा. मला जिथं पोहोचायचंय तिथली खडान्खडा माहिती हवी. तिथं पोहोचलेल्यांशी भेटावं लागेल. त्याचा प्रवास, त्यांनी घेतलेली मेहनत, कार्याची पद्धत,त्यांनी दिलेला वेळ, घेतलेले श्रम, केलेला त्याग, केलेली पूर्वतयारी,त्यांची पार्श्वभूमी अशा साºया गोष्टींचा डोळस विचार करायलाच हवा. आज बहुतांश युवक मुला-मुलींना काय करतो सध्या? असं विचारलं तर त्याचं उत्तर असतं स्पर्धा परीक्षेची तयारी चालू आहे. असं सांगताना दिसतात. चांगली गोष्ट आहे पण वरील सारं लक्षात घेऊन प्रयत्न केला पाहिजे. कारण नेमक्या गोष्टी नेमकेपणाने समजून नाही केल्या तर नेमकं साध्य साधता येत नसतं. स्पर्धा परीक्षा फॅशन नाही, फार्स तर नाहीच नाही.
लाखो मुलं आज या प्रवाहात मोठ्या उत्साहाने उडीतर घेतात, प्रयत्नही करतात. त्यासाठी मोठमोठ्या मेट्रो शहरात जाऊन तयारीही करतात. धावणाºयांना क्षितिजापर्यंत सीमा असते पण ते गाठण्याची जिद्द उरात असावी.या परीक्षा यशस्वी होणारे विश्वास नांगरे-पाटील,अनसर शेख,रमेश घोलप, रोहिणी भाजीभाकरे,पूनम पाटील असे अनेक (उर्वरितांना क्षमस्व ) हे युवकांचे आजचे प्रेरणास्थान बनले आहेत, यांनी भोगलेली दु:ख,घेतलेले कष्ट,यांची परिस्थिती,केलेले परिश्रम अगोदर चांगले समजून घ्यायला नको का? यू ही नहीं बनता कोई व्हीआयपी,केवळ नशीबाची साथ वगैरे अंशत्वाने काम करत असते. तहानभूकच नव्हेतर स्वत: ला विसरुन यांनी अविरत केलेले कष्ट व आत्मविश्वास हेच एकमेव कारण यांच्या यशाचं खरं रहस्य आहे. हे समजून घ्यावं लागेल.
आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावरील वेळ, श्रम,पैसा या साºया गोष्टी आपण यासाठी लावत असतो. तुमच्यासोबत परिवारांचं स्वप्न बनून जातं अगदी नकळत त्यात वावगंही काही नाही. नक्कीच स्वत:ला आजमावयाला काहीच हरकत नाही. पण कुठं थांबायचं ते ही ठरवता आलं पाहिजे. नाही गाठता आलं ध्येय तर गाठीशी असलेल्या अनुभवावर आपण खूप काही करु शकतो पदवीधर असतो आपण. स्पर्धा परीक्षेच्या तयारीतून जगण्याची जिद्द तर निर्माण व्हायला काही हरकत नसावी. अनेकजण उद्विग्न होऊन नको तो मार्ग अवलंबतात मग तुम्ही नेमक्या कोणत्या स्पर्धेची तयारी करत होता? हा प्रश्न आम्हाला पडतो. नसेल हिम्मत यश अपयशाशी टक्कर द्यायची तर मग इथंच एखाद्या छोट्या-मोठ्या व्यवसायाची टपरी टाका. किमान तुम्ही तरी वाचाल.
लोक काय म्हणतील याची काळजी कधीच करु नका. निष्क्रीय सल्लागाराचं पीक अमाप पिकतं आपल्याकडे, तुमच्या यशापेक्षा अपयशाची मजा पाहणाºया काही प्रवृत्ती या समाजात असतात, म्हणून खचू नका. एखाद्या क्षेत्रात खूप प्रयत्न करुनही यश मिळत नाही. तेव्हा तो अपराध खरंच ठरत नाही. माझं युवकांना सांगणं आहे. जे अभेद्य ते भेदण्याची धमक असते तो युवक असतो असाध्य ते साध्य करतो सायासाने तो तरुण असतो. हजारवेळा हरुनही जगण्याची जिद्द हरत नाही तो चिरतरुण असतो. या राष्ट्राला आता अधिकाºयापेक्षा देशाचं नेतृत्व मग कोणत्याही छोट्या-मोठ्या उपक्रमातून करणारा स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील युवक हवा आहे आणि तो बनण्यासाठी जिद्द ऊरात निर्माण करावी लागेल.
माझी पालकांना नम्र विनंती आहे की स्पर्धा परीक्षांविषयी थोडं खोलात जाऊन अभ्यास करा. तुमच्या मानसिकतेचा फायदा घेण्याचा बाजार समाजात भरतो आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी पहिलीपासून असं काही सांगून तुम्ही लुटले जाऊ शकता. प्रत्येक गोष्ट मुळातून निष्कर्षापर्यंत समजून घेणे हीच खरी स्पर्धा परीक्षेची तयारी असते. पण त्यासाठी मुलांचा छळ करु नका. असं अजाणतेपणानं काही करु नका.
स्पर्धा परीक्षांचा फार्स भलताच वाढतो आहे. कुठंतरी या साºया बाबींवर चिंतन, मनन जरुर व्हायलाच हवं. माणूसपणानं वागण्याच्या स्पर्धेत आपण खूप मागे पडत चाललो आहोत. मुलं १० वी १२ वीला असली की पै पाहुण्यांनाच नव्हेतर घरातील माणसांनाही प्रवेशबंदी करुन यश मिळवणारी मुलं जीवनाच्या स्पर्धेत कोणता टप्पा गाठणार तेव्हा समाजमंथन व्हायलाच हवं, आशा करतो की किमान या क्षेत्रातील जाणकार पालक,तज्ज्ञ व विद्यार्थी नक्कीच विचार करतील यावर.. बाकी प्रयत्नवादी विद्यार्थ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. यशस्वी भव..शुभं भवतु...- रवींद्र देशमुख(लेखक सृजनशील शिक्षक आणि अभ्यासक आहेत.)