गतवर्षीच्या खरीप पिकांसाठी विमा उतरलेल्या जवळपास पाच हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यापैकीच वडाळा येथील ८० शेतकरी विम्यापासून वंचित आहेत. विमा कंपनीला कळविल्यानंतर आलेले तक्रार नंबर शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांना दिले. कृषी अधीक्षक माने यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना तपासणी करण्यास सांगितले. याशिवाय गावातील शेतकऱ्यांच्या तक्रारी गावात जाऊन मार्गी लावण्याच्या सूचना माने यांनी दिल्या.
कृष्णात साठे, मधुकर साठे, मनोज साठे, शंकर मोरे, राहुल साठे, प्रताप ढवण, दत्तात्रय कुलकर्णी, रवींद्र साठे आदींनी विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. उत्तर सोलापूर तालुक्यातील ७ हजार ८१० शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा भरला होता. त्यापैकी ४ हजार ७२५ शेतकरी विम्याच्या नुकसानीपासून वंचित राहिले आहेत. हे सर्व शेतकरी आम्हाला कधी नुकसान भरपाई मिळणार?, अशी विचारणा करीत आहेत.
----
कंपनी मात्र नफ्यात
विमा कंपनीने उत्तर तालुक्यातील ३ हजार ८५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एक कोटी २४ लाख ७२ हजार रुपये जमा केले आहेत. मात्र, कंपनीला शेतकरी हिस्सा तसेच केंद्र व राज्य शासनाकडून ५ कोटी ६५ लाख ७१ हजार रुपये मिळाले आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मात्र नियमाचे भूत दाखवले जाते.
----
विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन शेतकऱ्यांकडील कागदपत्रे तपासणी करावीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळतील व विम्यापोटी दरवर्षी पैसे भरुनही नुकसान भरपाई का मिळत नाही?, हे ही लक्षात येईल.
- कृष्णात साठे शेतकरी, वडाळा
----