सोलापूर : एखादी तक्रार करायची असेल तर पोलीस चौकीत न जाता आता घरी बसून नागरिकांना तक्रार करता येणार आहे. यासाठी महाराष्ट्र पोलीस दलामार्फत राज्यातील सर्व नागरिकांना सिटीजन पोर्टल या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.
नागरिकांना तक्रार दाखल करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाकडून सिटीजन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. नागरिकांना घरबसल्या तक्रार दाखल करता येणार आहे. त्याची दखल तत्काळ संबंधित पोलीस ठाणे घेऊन संबंधितांशी संपर्क साधून फिर्याद दाखल करून घेणार आहेत.
ज्या व्यक्तींना या सुविधांचा वापर करता येत नाही त्यांना केंद्रात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून २३ सुविधा सुरू करण्यात आल्या असून त्यापैकी ९ सुविधा संबंधित व्यक्तीला लॉगीन आय.डी. व पासवर्डचा वापर न करता लाभ घेता येणार आहे. इतर १४ सुविधांकरिता स्वत:चा लॉगीन आय.डी. व पासवर्ड तयार करून इतर सुविधांचा वापर करता येणार आहे.
नोंदणी न करता पाहता येणाºया सुविधा- प्रथम खबर पाहणे (महिलांशी व संवेदनशील गुन्हे वगळता), अटक आरोपीची माहिती पाहणे, हरवलेल्या व्यक्तीची माहिती पाहणे, अनोळखी मृतदेहाची माहिती पाहणे, गहाळ झालेल्या मोबाईलची सूचना देणे आदी ९ प्रकारच्या सुविधा पाहता येणार आहेत. संकेतस्थळी नोंदणी करून उपलब्ध सुविधा- ई-तक्रार देणे, सार्वजनिक गणेशोत्सव/नवरात्रोत्सव परवाना अर्ज करणे, वाहन चौकशी करणे, चारित्र्य प्रमाणपत्र विनंती अर्ज सादर करणे, इतर मिरवणूक परवाना अर्ज सादर करणे, भाडेकरू / पी.जी. माहिती देणे आदी प्रकारच्या १४ सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
आधुनिक युगात बदलत्या जगाबरोबर कामकाजात आमूलाग्र बदल होत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाच्या संकेतस्थळामुळे नागरिकांना सहज तक्रारी करता येणार आहेत. यामुळे गुन्हेगारीला आळा बसणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा योग्य वापर करून पोलिसांना सहकार्य करावे.- महादेव तांबडेपोलीस आयुक्त