साेलापूर : स्मार्ट सिटी कंपनीच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षाचा ‘आयटी सल्लागार’ नेमणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या निविदा प्रक्रियेत एका कंपनीचे ‘मेरिट’ पद्धतशीरपणे वाढविण्यात आले. हे काम स्मार्ट सिटीचे तज्ज्ञ संचालक नरेंद्र काटीकर यांनी केल्याची तक्रार पुण्यातील सुर्यकुमार शिवसागरन् यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली आहे. सुर्यकुमार यांची तक्रार चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे काटीकर यांनी म्हटले आहे.
शहराचा पाणीरवठा, पथदिवे यासह विविध सेवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी साेलापूर डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशन कंपनी महापालिकेत एक मध्यवर्ती नियंत्रण कक्ष (इंटिग्रेटेड कमांड ॲन्ड कंट्राेल सेंटर) स्थापन करत आहे. यासाठी सुमारे ४० काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मध्यवर्ती नियंत्रण कक्षातील साॅफ्टवेअर्स, ऑनलाईन सेवा, संगणकीय यंत्रणा कशाप्रकारची हवी यासाठी एका तांत्रिक सल्लागारही नेमणूक हाेत आहे. या सल्लागाराच्या नेमणुकीसाठी निविदा काढण्यात आली. त्यात चार कंपन्यांनी सहभाग नाेंदविला. त्यातील रॅन्स कंपनीला स्मार्ट सिटीचे तज्ज्ञ संचालक नरेंद्र काटीकर यांनी अतिशय पद्धतशीरपणे गुण वाढवून दिल्याचे सुर्यकुमार शिवसागरन् यांचे मत आहे. रॅन्स कंपनीने यापूर्वी शाळा व काही रेस्टाॅरंटच्या बिलिंग सिस्टीमसाठी काम केले. या कंपनीने सादर केलेली कागदपत्रे ‘मॅनेज’ आहेत.
या कंपनीपेक्षा इतर दाेन कंपन्यांनी विविध शहरातील स्मार्ट सिटीजसाठी काम केले आहे. या कंपन्यांना शासकीय कामांचा अनुभवही आहे तरीही त्यांना डावलून शाळा व रेस्टाॅरंटची बिलिंग सिस्टीम तयार करणाऱ्या कंपनीला साेलापूर डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशन कंपनी प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. यातून लाेकांचा पैसा वाया जाण्याची भीती आहे. शिवाय एक संभ्रमही निर्माण करत असल्याचा मुद्दाही शिवसागरन् यांनी उपस्थित केला आहे.
सुर्यकुमार शिवसागरन् यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे तक्रार केली हाेती. यावर आयुक्तांकडे बैठकही झाली. काटीकर यांनी तज्ज्ञ सल्लागार म्हणून या निविदा प्रक्रियेत मत नाेंदविले. निविदेवर अद्यापही निर्णय झालेला नाही. हा निर्णय मेरिटवरच हाेईल. तांत्रिक तपासणी सुरूच आहे. त्रुटी आढळल्या तर फेरनिविदा काढू.
- त्रिंबक ढेंगळे-पाटील, कार्यकारी संचालक, स्मार्ट सिटी कंपनी.
----
तक्रारदाराने निविदा भरलेली नाही. त्यांना मिळालेली माहिती चुकीची आहे. मी या निविदा प्रक्रियेत एक तांत्रिक मत नाेंदवले आहे. इतर अधिकारीही तांत्रिक मत देत असतात. अजूनही यावर काेणताही निर्णय झालेला नाही. माझे एकट्याचे मत ग्राह्य धरले जाते असे नाही. इतर अधिकारीही निर्णय घेतात.
- नरेंद्र काटीकर, तज्ज्ञ संचालक, स्मार्ट सिटी कंपनी.
---
मी एक सामान्य नागरिक म्हणून स्मार्ट सिटीच्या निविदा प्रक्रियेतील मेरिटवर बाेट ठेवले. यासाठी मी पुरावेही जाेडले आहेत. अंतिम निर्णय आयुक्त व कार्यकारी संचालक यांनीच घ्यायचा आहे.
- सूर्यकुमार शिवसागरन्, तक्रारदार.
माझ्याकडे शुक्रवारी झालेल्या बैठकीत रस्ते कामांबाबत चर्चा झाली. आयटी तांत्रिक सल्लागार प्रकरणावर फक्त चर्चा झाली. या प्रकरणातील कागदपत्रे व इतर माहिती मला मिळाली नाही. मंगळवारी याबद्दलची माहिती घेऊन पडताळणी करू.
- पी. शिवशंकर, आयुक्त, मनपा.