पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला मोठ्या श्रद्धेने दान देणाºया भाविकाची देणगी पावतीद्वारे फसवणूक करणाºया त्या कर्मचाºयावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीने गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव सिद्धेश्वर विठ्ठल घायाळ (रा. कोंढारकी, ता. पंढरपूर) असून तो मंदिर समितीत वायरमन म्हणून काम करत आहे.
श्री विठ्ठल मंदिर समितीमध्ये इलेक्ट्रिक विभागात वायरमन म्हणून सिद्धेश्वर विठ्ठल घायाळ हे काम करतात. सिद्धेश्वर घायाळ याने एका भाविकाला मंदिर समितीची बाद झालेली पावती ही खरी आहे, असे भासवून त्याच्याकडून एक हजार शंभर रुपयांची रोख रक्कम स्वीकारून भाविकाची फसवणूक केली.
याची कुजबूज पोलीस नाईक वामनराव यलमार यांच्या कानावर पडताच, त्यांनी विठ्ठल मंदिर ते दर्शन मंडपाच्या पुलावर असलेल्या बाकड्यांची तपासणी केली. यावेळी त्यांना दोन पावती पुस्तके मिळाली. तसेच फसवणूक झालेल्या भाविकाचे नाव दीपेश रामजीवन भंडारी (रा. गंगाखेड, जि. परभणी) असल्याचे समजले. यानंतर पोलीस नाईक वामनराव यलमार यांनी मंदिर समितीच्या कार्यालयातील कर्मचारी शहाजी देवकर, राजू घागरे, सावता हजारे यांच्याबरोबर सीसीटीव्हीचे चित्रीकरण पाहिले. यावेळी दीपेश भंडारी या भाविकाला अकराशे रुपयांची पावती सिद्धेश्वर विठ्ठल घायाळ याने दिल्याचे निदर्शनास आले. यामुळे ही बाब पोलीस नाईक वामनराव यलमार यांनी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांना सांगितली. यानंतर मंदिर समितीने सिद्धेश्वर घायाळ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पावती पुस्तकाचा गैरवापर...- सन २००१ साली देणगी गोळा करण्यासाठी छापण्यात आलेली पावती पुस्तके मंदिर समितीने प्रशासकीय कारणास्तव रद्दबातल केली होती. ती देणगी पावती पुस्तके मंदिर समितीच्या स्टोअर रूममध्ये पोत्यात बांधून ठेवली होती. त्या पावती पुस्तकापैकी १५५२ व २८४० या नंबरची रद्दबातल पावती पुस्तके कोणाचीही परवानगी न घेता सिद्धेश्वर घायाळ याने पळवली. त्या पावती पुस्तकांचा गैरवापर करून भाविकाची फसवणूक केली म्हणून मंदिर समितीच्या वतीने सिद्धेश्वर घायाळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.