सोलापूर दि २३ : जिल्ह्यातून जाणाºया पाच महामार्गांसाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी महसूल यंत्रणेला सहकार्य करावे, असे आदेश अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सोमवारी सर्व शासकीय विभागांना दिले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत राज्यातील अपूर्ण रस्ते महामार्गांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महामार्गांच्या कामाबाबत यंत्रणेला गती देण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर अपर जिल्हाधिकारी शिंदे यांनी सोमवारी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांसह सर्व यंत्रणांची बैठक घेतली. यात वन, कृषी, भूजल सर्वेक्षण आणि विकास, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यासह विविध विभागांचा समावेश होता. मार्चअखेर भूसंपादनाचे काम पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांना नियोजनपूर्वक काम करावे, अशा सूचना केल्या. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी त्यांच्या अडचणी मांडल्या. सांगोला, करमाळा येथील कामात येणाºया अडचणी गृहीत धरून नियोजन करण्याची सूचना अपर जिल्हाधिकारी शिंदे यांनी केली.
----------------------------ही आहेत कामे- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग : आळंदी-पंढरपूर-मोहोळ, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग : बारामती-अकलूज-पंढरपूर, सांगोला-मंगळवेढा-सोलापूर, करमाळा-टेंभुर्णी-पंढरपूर, अक्कलकोट- सोलापूर या मार्गांच्या कामांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. सांगोला येथील कामाबाबत काहीजणांनी हरकत घेतली होती, परंतु हा विषय निकाली निघाला आहे. यातील बहुतांश कामांचे टेंडर राजमार्ग प्राधिकरणाकडून काढण्यात आले आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.