सांगोला : शासन दरबारी रखडलेल्या सर्व सिंचन योजना पूर्ण करून तालुक्याच्या वाट्याचे मंजूर पाणी मिळवून देऊ, असे आश्वासन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांना दिले.
आवंढी येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी जत तालुक्यातील वंचित ६५ गावांना नव्याने सहा टीएमसी पाणी मंजूर केल्याबद्दल आवंढी शेतकरी, ग्रामस्थांनी त्यांचा विशेष सत्कार केला. त्यानंतर, मंत्री जयंत पाटील यांनी जवळा (ता.सांगोला) येथे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी आश्वासन दिले.
यावेळी दीपक साळुंखे म्हणाले, जत तालुक्यातील वंचित गावांचा कायापालट होण्यास सुरुवात झाली आहे. ६५ गावांना सहा टीएमसी पाणी मिळाल्यास येथील शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. जतच्या शेजारीच शिवेला असणाऱ्या सांगोला तालुक्यातील पाणीप्रश्नही तितकाच गंभीर आहे. सांगोला तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या ५० वर्षांपासून येथील जनता संघर्ष करीत आहे.
तालुक्याचा पाणीप्रश्न आता मार्गी लागला आहे, असे बोलून मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आता आमच्या दुष्काळी सांगोला तालुक्याकडे लक्ष द्यावे व शासन दरबारी टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा, सांगोला शाखा कालवा, उजनी उपसा सिंचन योजना अशा विविध सिंचन योजनांतून तालुक्याच्या वाट्याला मंजुर असणारे पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
----------
फोटो ओळी
रखडलेल्या योजना संदर्भात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करताना दीपक साळुंखे-पाटील.
.......
२४ सांगोला १