अकलूज : शिरापूर, दहिगाव, आष्टी, एकरुख, सीना-माढा या उपसा सिंचन योजनांसह बोरी मध्यम प्रकल्प, कुकडी, नीरा-देवधर, टेंभू, म्हैसाळ आणि ताकारी या सिंचन योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याच्या भावना खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केल्या. जिल्ह्यातील नियोजित उपसा सिंचन योजना, रखडलेल्या योजना व इतर पाणी प्रश्नांसंदर्भात खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकलूजमध्ये बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीसाठी आ. गणपतराव देशमुख, आ. बबनराव शिंदे, माजी आ. सुधाकरपंत परिचारक, आ. हनुमंत डोळस, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. शामल बागल, माज मंत्री आ. लक्ष्मणराव ढोबळे, जयवंतराव जगताप, मनोहर डोंगरे, विनायक पाटील, कल्याणराव काळे, विलासराव घुमरे, गुरुनाथ कटारे, विद्या शिंदे, बळीराम साठे, राजशेखर शिवदारे, उमाकांत राठोड, संजय पाटील-घाटणेकर, राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एस. एम. उपासे, अधीक्षक अभियंता बी. डी. तोंडे, अजय दाभाडे, धनेश निटूरकर, तानाजी झेंगटे, दीपक पांढरे, बी. आर. बोकडे, कल्याणराव पाटील, मल्लिकार्जुन पाटील, दिलीप सिद्धे, बाळासाहेब मोरे, राजू क्षीरसागर, मल्लिनाथ करपे, आमसिद्ध कांबळे उपस्थित होते. सांगोला तालुक्यातील तळेगाव-बेरडवाडी येथील रामोसी समाजाच्या जमिनी सिंचन योजनांसाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. त्या १९ शेतकऱ्यांचे १६ लाख रुपये देणे तातडीने देऊन टाकणे, कोळे व जुनोनी येथील कामाचे टेंडर काढणे, १ टीएमसी क्षमतेचा बुद्धेहाळ तलाव ३० जूनपर्यंत पूर्ण क्षमतेने भरून घेणे, मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत सिंचन योजनेसाठी ५० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते आश्वासन पूर्ण करण्यात आले नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर्षीच्या बजेट व्यतिरिक्त ८० कोटी रुपये आणखी मंजूर झाल्यास पंढरपूरपर्यंत पाणी नेता येईल, असे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एस. एम. उपासे यांनी सांगितले. यावेळी आ. गणपतराव देशमुख यांनी आंध्र प्रदेश सरकार जलसंपदा खात्याच्या जमिनी विकून सिंचनाची कामे पूर्ण करते आहे. महाराष्ट्र शासनानेही हीच पद्धत अवलंबली तर सर्व सिंचन योजना पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त केला. माजी आ. सुधाकरपंत परिचारक यांनी कोक नदीतून पाणी सोडण्याच्या मागणीबरोबर पंढरपूर तालुक्यासह माढा आणि माळशिरस तालुक्यातील भीमा नदीवरील बंधाऱ्यांत दोन दोन दारे टाकून पाणी अडविण्यात यावे, त्याबरोबरच नीरा उजव्या कालव्यावरील भाळवणी शाखा क्र. १ व २ वर माळशिरस व पंढरपूर उपविभागाचे नियंत्रण आहे. हे नियंत्रण कोणत्यातरी एका विभागाकडे सोपवावे, अशी मागणी केली. चर्चेअंती शाखा क्र. २ माळशिरसला जोडण्याचा निर्णय झाला. सांगोला व पंढरपूर तालुक्यातील पाणी वापर सोसायट्यांना परवानगी मिळत नसल्याची तक्रार कल्याणराव काळे यांनी केली. तर आमच्या खात्याकडील शाखा अभियंते व इतर अधिकाऱ्यांची ८४ पदे रिक्त आहेत. मनुष्यबळाअभावी अनेक कामे रखडल्याचे अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले. यावर वरिष्ठ अधिकारी उपासे यांनी ६ महिन्यांत सर्व पदे भरणार असल्याचे सांगितले. आ. बबनराव शिंदे यांनी पाटबंधारे खात्याने सापटणे गावातील साठवण तलावाला मंजुरी द्यावी, ज्यावेळी कॅनॉलला पाणी असेल त्यावेळी पंढरपूर तालुक्यातील बंधारे भरून घ्यावेत, सीनेच्या बोगद्यातून तातडीने पाणी सोडावे, जिथे पाझर जास्त असेल तेथे लायनिंगची कामे करून घ्यावीत, मोडनिंब फाट्याच्या सर्व स्ट्रक्चरची टेंडर १ महिन्यात काढावीत, या मागण्या केल्या. या बैठकीत अक्कलकोट, माढा, करमाळा दक्षिण सोलापूर तालुक्यासह जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. (पूर्वार्ध) ------------------------------------६५ कि. मी. ची कामे सुरु४एस. एम. उपासे यांनी सध्या ६५ कि. मी. अंतराची कामे सुरू आहेत, ६५ ते १०० कि. मी. कामाचे टेंडर लवकरच काढणार आहोत तर १०० पासून पुढील अंतराचा सर्व्हे सध्या सुरू आहे. धोम बलकवडीच्या कॅनॉलला टेल मायनर काढून पाणी पुढे नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सिंचनात मतिमंद माणसे...४मनुष्यबळ नाही, गेट बसविण्यासाठी निधी नाही अशी कबुली अधिकाऱ्यांनी देताच कसली मतिमंद माणसे घेऊन सिंचन खाते काम करते अशी टीका माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली.
रखडलेल्या योजना पूर्ण करणार
By admin | Published: June 20, 2014 12:40 AM