सोलापूर : मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार परत या.. परत या... अशी हाक देत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस वगळता सेना-भाजपा-माकपासह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बुधवारच्या ‘सोलापूर बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कुठलाही अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत पार पडला. काही भागात कडकडीत बंद तर अन्य भागात दैनंदिन व्यवहार सुरू असल्याचे एकूणच चित्र पाहावयास मिळाले. शहरातील पिण्याच्या पाणीप्रश्नावर तोडगा काढत असतानाच सोमवारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले. या नगरसेवकांच्या जाचाला कंटाळून मनपा आयुक्त गुडेवार यांनी राज्य शासनाकडे बदलीची मागणी करीत सोलापूरला रामराम ठोकला. गुडेवार यांच्यामुळेच आता कुठे शहराच्या विकासाला गती येत आहे. ‘आम्हाला गुडेवार हवेत...!’ हा मुद्दा घेऊन आणि काँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांच्या निषेधार्थ सेना-भाजपा, माकपा, बसपाच्या वतीने ‘सोलापूर बंद’ची हाक दिली. शहरातील प्रमुख बाजारपेठा म्हणून ओळखल्या जाणार्या भागात व्यापार्यांनी कडकडीत बंद पाळला. लकी चौक, पांजरापोळ चौक, नवीपेठ, राजवाडे चौक, मधला-मारुती, सराफ कट्टा, चाटी गल्ली भागातील व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवून ‘सोलापूर बंद’ यशस्वी केला. चाटीगल्लीत लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आलेल्या वºहाडी मंडळींना हात हलवत परतावे लागले. या बाजारपेठा वगळता अन्य भागातील व्यापार्यांनी ‘बंद’ला फाटा दिला. होटगी रोड, सात रस्ता, रेल्वे लाईन परिसर, राजेंद्र चौक, विजापूर वेस, कुंभार वेस, कन्ना चौक भागात ‘बंद’ला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. महापालिकेच्या परिवहन समितीच्या बसगाड्या नेहमीप्रमाणे धावत होत्या. रिक्षाचालकांचाही बंदमध्ये सहभाग दिसला नाही. त्यामुळे शहरवासीयांना बंदचा परिणाम जाणवला नाही. हैदराबाद रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील अडत दुकानांमध्ये व्यवहार होत असल्याचे दिसले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. नवीपेठ परिसरात शस्त्रधारी पोलिसांना तैनात करण्यात आले होते. दुपारनंतर आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी गुरुवारी आपण महापालिकेत पदभार स्वीकारणार असल्याचे जाहीर करताच दत्त चौकात फटाके फोडण्यात आले. तसेच व्यापार्यांनी आपली दुकाने उघडावीत, असे आवाहन केल्यानंतर टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरळीत झाले. काही भागातील व्यापार्यांनी दुकाने अर्धवट उघडून व्यवहार चालू ठेवले होते. ज्या भागातून मोर्चा येणार आहे, त्या भागातील व्यापार्यांनी भीतीपोटी दुकाने बंद ठेवली होती. (प्रतिनिधी) मोर्चा मार्गस्थ झाल्यानंतर बंद असलेली दुकाने पुन्हा सुरू झाली. कुंभारवेस चौकात भाजपाचे नगरसेवक नागेश वल्याळ, राजकुमार पाटील आदी कार्यकर्त्यांनी व्यापार्यांना बंदचे आवाहन करीत असताना पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
सोलापूर बंदला संमिश्र प्रतिसाद
By admin | Published: May 07, 2014 11:25 PM