टेंभुर्णी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले मोहन गणपत भोये या पोलीस कर्मचाऱ्यांची कार २० फेब्रुवारी २०१८ रोजी रात्री पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरीस गेली होती. एका पोलिसाची कार तीही थेट पोलीस ठाण्यातून चोरून नेण्याचे धाडस अज्ञात चोरट्याने दाखविले होते. याची माहिती काेणालाही नव्हती. नंतर दबक्या आवाजात शहर व परिसरात चर्चा सुरू झाली. पोलिसांची कार तिही पोलीस ठाण्यातून चोरीस गेली याचे नागरिकांना आश्चर्य वाटत होते. या धाडसी अज्ञात चोरास पकडून गजाआड करण्याचे टेंभुर्णी पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर तीन वर्षांनंतर गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना यश आले आहे.
पोलीस ठाण्यातून चोरून नेलेली कार एक तरुण नंबर बदलून वापरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना मिळाली. त्यादृष्टीने त्यांनी फिल्डिंग लावली. २२ मार्च २०२१ रोजी राजकुमार केंद्रे यांना खबऱ्यामार्फत भोये यांची कार चोरलेला तरुण ती नंबर बदलेली कार घेऊन टेंभुर्णीकडून कुर्डूवाडीकडे जाणार आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार केंद्रे यांनी येथील कुर्डूवाडी चौकात नाकाबंदी करून सापळा लावला. पहाटे ४ वाजता एम. एच. ४२ के. ७१९५ या क्रमांकाची एक कार कुर्डुवाडी चौकात आली असता ती थांबवून पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत पोलिसांना संशय आल्याने या कारची अधिक तपासणी करण्यास सुरुवात केली. कारचा चॅसिस नंबर व इंजिन नंबर तपासून पाहिले तेव्हा ही कार चोरीची असल्याची पोलिसांची खात्री पटली. खरा धक्का तर तेव्हा बसला की कार चोरणारा तरुण योगेश ज्ञानेश्वर मिस्कीन (२४, रा. मिटकलवाडी ता. माढा) हा तर एकेकाळी पोलीस ठाण्यातच एका पोलीस कर्मचाऱ्याकडे रोजंदारीवर कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करीत होता.
टेंभुर्णी पोलिसांनी योगेश मिस्कीन याच्यावर भादंवि ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून कार ताब्यात घेतली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, हेडकॉन्स्टेबल बजरंग बोराटे, पोलीस नाईक अलीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल केशव झोळ, डोंगरे यांनी केली.