सोलापूर : शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी आरआरसीची कारवाई केलेल्या जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे पैसे कधी मिळणार हे तहसीलदारांच्या कारवाईवर अवलंबून आहे.
यावर्षी हंगामासाठी गाळपाला आणलेल्या उसाचे पैसे कारखानदारांनी थकवले आहेत. विठ्ठलराव शिंदे करकंब, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर, विठ्ठल काॅर्पोरेशन म्हैसगाव व पांडुरंग श्रीपूर हे साखर कारखाने सोडले तर सर्वच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकविले आहेत. मात्र, यापैकी सात साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी १० मार्च रोजी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व प्रादेशिक साखर सहसंचालक सोलापूर कार्यालयाला १० मार्च रोजी पुढील कारवाई करण्याबाबत कळविले आहे.
त्यानुसार साखर व इतर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना दिले आहेत. आता तहसीलदार साखर व इतर मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई करून त्याची विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याची प्रक्रिया पूर्ण करतील.
- 0 श्री. विठ्ठल गुरसाळे- ३९ कोटी ७६ लाख रुपये.
- 0 गोकुळ माऊली शुगर -२१ कोटी ६ लाख रुपये
- 0 सिद्धनाथ शुगर तिर्हे- ७२ कोटी ९६ लाख रुपये.
- 0 विठ्ठल रिफायनरी- ६० कोटी ६१ लाख रुपये.
- 0 जय हिंद शुगर-६१ कोटी ८१ लाख रुपये.
- 0 लोकमंगल शुगर बीबीदारफळ ३१ कोटी ३९ लाख रुपये.
- 0 लोकमंगल शुगर इथेनाॅल भंडारकवठे- ७७ कोटी ६८ लाख रुपये.