सोलापूर : व्यासपीठावरील डिजिटल फलकावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांचेच फोटो नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत गोंधळ घातला. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानंतर शिंदे समर्थक शांत झाले.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या नियोजनासाठी रविवारी सकाळी हेरिटेज लॉनवर महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. बैठकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मंचावर लावलेल्या डिजिटल फलकावर सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नसल्याचे लक्षात आले. तेव्हा काँग्रेसचे संतप्त कार्यकर्ते ‘शिंदे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देऊ लागले. काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागल्याने ज्येष्ठ लोकही बाजूला झाले. गृहराज्यमंत्री सतेज पाटील मंचावरून खाली आले. त्यांनी कार्यकर्त्यांना समजावून सांगितले.
‘शिंदे आमच्या हृदयात’या गोंधळानंतर उदय सामंत म्हणाले, फलकावर फोटो नसला तरी सुशीलकुमार शिंदे तीनही पक्षांच्या हृदयात आहेत. शिंदे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता.