उत्तर सोलापूर तालुक्यात ४० गावे असली तरी ११ गावात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्याची आरोग्य खात्याची आकडेवारी सांगतेय. उर्वरित २९ पैकी १७ गावांची आरोग्य खाते, आरोग्य सेविका व गावपातळीवरुन घेतलेल्या आकडेवारीत मोठी तफावत असल्याचे दिसत आहे.
आरोग्य खात्याकडील नोंदीनुसार या १७ गावात कोरोना सुरुवात झाल्यापासून
७९ व्यक्ती मयत झाल्या आहेत. तर गावपातळीवर सरपंच व गावकऱ्यांकडून घेतलेल्या आकडेवारीनुसार १४० व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. म्हणजे कोरोनामुळे दगावलेल्या ६१ व्यक्तींची नोंदच आरोग्य खात्याकडे नाही.
----
कौठाळीत आरोग्य खात्याकडे ४ तर आरोग्य सेविकेकडे १० मृत्यूची नोंद आहे. ग्रामस्थांच्या मते १७ मृत्यू झाले. मार्डीत १३ दगावल्याचे सांगतात मात्र ९ ची नोंद आहे.
- बीबीदारफळमधील आरोग्य खात्याकडे १६ ची नोंद असली तरी आरोग्य उपकेंद्रात ३१ ची नोंद आहे. रानमसलेची आरोग्य विभागाकडे ६ ची, आरोग्य सेविकेकडे १२ ची नोंद तर गावकऱ्यांच्या मते १५ व्यक्ती कोरोनामुळे मृत झाल्या.
- कळमणमध्ये ७ व्यक्तींचा मृत्यू झाला असला तरी दफ्तरी ३ ची नोंद आहे. भागाईवाडीत गावकरी व आरोग्य सेविकेकडे दोघांच्या मृत्यूची नोंद असली तरी आरोग्य खात्याकडे शून्य नोंदला आहे. अकोलेकाटी, पडसाळी, कारंबा, पाथरी व हगलुरमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेला प्रत्येकी एक तर गुळवंची व कोंडीत प्रत्येकी दोन
व्यक्ती कमी नोंदला आहे. कवठे येथे १४ व्यक्ती कोरोनामुळे मृत झाल्याचे गावकरी सांगतात मात्र आरोग्य विभागाकडे ५ इतकी नोंद आहे.
----
एकही मृत्यू झाला नाही
उत्तर सोलापूर तालुक्यातील साखरेवाडी, भागाईवाडी, शेरेवाडी, तेलगाव, समशापूर, राळेरास, नरोटेवाडी, होनसळ, सेवालालनगर, एकरुख, तरटगाव या गावात कोरोणाचा एकही बळी गेला नसल्याची आरोग्य खात्याची नोंद आहे.
---
लसीकरण व टेस्टिंगमध्ये अडकल्याने मृत्यूच्या नोंदीकडे लक्ष देता आले नाही. आढावा घेऊन व खात्री करुन आकडेवारी देतो.
- श्रीकांत कुलकर्णी
तालुका वैद्यकीय अधिकारी
----