सोलापूर : पार्क चौक येथील जिल्हा परिषदेच्या नेहरू वसतिगृहात प्रवेश अर्ज घेण्यासाठी आलेल्यांना फक्त १०० अर्ज मिळाल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला; मात्र विद्यार्थ्यांना कूपन पद्धत सुरू केल्याने वाद निवळला. शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी नेहरू वसतिगृहात प्रवेश दिला जातो. या वसतिगृहाची प्रवेश क्षमता ५६७ इतकी आहे. ही प्रवेश प्रक्रिया दि. २० जूनपासून सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी अर्ज घेण्यासाठी ३०० ते ४०० विद्यार्थ्यांनी सकाळी ९.३० वा. मोठी गर्दी केली होती. मात्र वसतिगृहात शुक्रवारी फक्त १०० अर्जांची विक्री करण्यात आली. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी आम्हालाही अर्ज देण्यात यावेत, अशी मागणी करीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली; मात्र वसतिगृह अधीक्षक एस. पी. चव्हाण यांनी मुलांची समजूत काढत सर्वांना अर्ज दिले जातील, सर्वांना प्रवेश मिळेल, असे सांगून पुन्हा उद्या अर्जांची विक्री केली जाईल, असे सांगितले. तरीही मुले ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे पाहून सर्वांना कूपन देण्यात आले. या कूपनवर शनिवारी त्यांना प्रवेश अर्ज दिला जाणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, अशी जाहिरात देण्यात आल्याने मुलांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली होती. वसतिगृहात १८९ खोल्या असून ५६७ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. एका विद्यार्थ्याला वर्षाकाठी १ हजार १५५ रुपये इतकी फी असल्याने ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना हे वसतिगृह अतिशय सोयीचे ठरते. पूर्वी याच वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी होती; मात्र शिक्षणाचे वाढते प्रमाण आणि महागाई लक्षात घेता ही गर्दी वाढत आहे.----------------वसतिगृहात प्रवेश देताना गोंधळ उडू नये यासाठी पहिल्या दिवशी फक्त १०० अर्ज विक्री करण्यात आले आहेत. त्यांची मागणी पाहता शनिवारी २०० ते २५० अर्जांची विक्री केली जाईल. प्रवेश क्षमता पूर्ण होईपर्यंत अर्ज विक्री चालू राहणार आहे. सर्व गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. - एस. पी. चव्हाणअधीक्षक, नेहरू वसतिगृह
प्रवेशावरून नेहरू वसतिगृहात गोंधळ
By admin | Published: June 21, 2014 1:12 AM