अशोक कांबळे
मोहोळ : लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान सर्वच पक्षातील नेते व कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाच्या भूमिका मांडत वैयक्तिक टीकेबरोबरच राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांना चांगलेच टार्गेट केले होते. यामुळे काँग्रेसची मते फुटतील असे वाटत होते. असे असले तरी जिल्ह्यात फक्त मोहोळ तालुक्याने काँग्रेसला मताधिक्याने आजही राजन पाटलांची ‘मालकशाही’च वरचढ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघातून १५ हजार १२९ मतांची आघाडी मिळाली असून, एकट्या मोहोळ तालुक्यातून शिंदे यांना १२ हजारांची आघाडी दिली आहे तर प्रकाश आंबेडकरांना ३० हजार १५४ मते मिळाली आहेत.मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने गेली दोन टर्म राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्या माध्यमातून तालुक्यात राष्ट्रवादीची सत्ता अबाधित ठेवण्यात दोन्ही नेत्यांना यश आले होते.
दोन्ही निवडणुकांत राष्ट्रवादीने माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे तर विद्यमान आमदार रमेश कदम यांना निवडून दिले होते, परंतु लक्ष्मणराव ढोबळे यांचा भाजप प्रवेश व मनोहर डोंगरे यांनी राष्ट्रवादी सोडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेल्या गटबाजीला उधाण आले. याचाच फायदा घेण्यासाठी म्हणून येऊ घातलेल्या विधानसभेसाठी सर्वच पक्षात नेतेमंडळींसह स्थानिक उमेदवारांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी, काँग्रेससह सेना-भाजपबरोबरच वंचित आघाडीच्या माध्यमातून प्रचार केला. याच निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत सर्वच पक्षांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्यासाठी प्रयत्न केला.
सर्व विरोधक एकीकडे तर राजन पाटलांची एकाकी झुंज अशी स्थिती असतानाही मोहोळ तालुक्याबरोबरच मतदारसंघाने काँग्रेसला आधार दिला. राष्ट्रवादीने एकाकी झुंज देऊनही काँग्रेसला मताधिक्य मिळाले. ही बाब भविष्यात भाजप व विरोधकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
या माजी आमदार राजन पाटील, लोकनेतेचे चेअरमन बाळराजे पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराबरोबरच आगामी विधानसभेत राष्ट्रवादीचा किल्ला मजबूत ठेवण्यासाठी वाड्या-वस्त्यांसह मतदारसंघ पिंजून काढल्याने काँग्रेसला मताधिक्य मिळाले आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघ राखीव असल्याने मोहोळ तालुक्यासह उत्तर सोलापूरची २७ गावे तर पंढरपूर तालुक्यात १७ गावे आहेत.
मतदारांचा विश्वासच : राजन पाटीलसोलापूर लोकसभेच्या झालेल्या मतदानामध्ये एकीकडे भाजपची लाट असताना मोहोळ विधानसभा मतदारसंघातून पंधरा हजारांपर्यंत आघाडी दिली तर मोहोळ तालुक्यातून सुमारे बारा हजारांची आघाडी देत तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व मतदारांनी दाखवलेला विश्वास कदापी विसरणार नाही. यापुढेही विकासाची कामे करणार आहे, असे माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले.