शिवानंद फुलारी
अक्कलकोट : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अक्कलकोट तालुक्यातील ३५९ बुथपैकी ३११ बुथवर भाजपला तर केवळ ४८ ठिकाणीच काँग्रेसला मताधिक्य मिळाले आहे. भाजपला तब्बल ४७ हजार ४२९ इतके मताधिक्य मिळाले आहे. तसेच वंचित आघाडीमुळे काँग्रेसला अधिक तर भाजपला कमी प्रमाणात फटका बसला आहे.
अक्कलकोट तालुका तसा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला समजला जातो. मात्र अलीकडच्या काळात हे चित्र पुसत चालले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून दुधनीकडे पाहिले जाते. दोन वर्षांपूर्वी झालेली नगरपालिकेची निवडणूक वगळता आतापर्यंत कोणत्याच निवडणुकीत भाजपला मताधिक्य नव्हते. काँग्रेसचे विद्यमान आमदार म्हेत्रे यांचे मूळ गाव असून, या गावात यंदा ५२१ मतांचे प्रथमच भाजपला मताधिक्य मिळाले आहे.
अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती सुरेखा काटगाव यांच्या हंद्राळ गावी भाजपला ९० मतांची लीड मिळाली आहे. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी राहणाºया सलगर गावातसुद्धा भाजपला १ हजार २७० मतांची आघाडी आहे.
जि़ प़ चे कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्या गावी ९४१ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. मैंदर्गी येथे भाजपला १ हजार ४६० चे मताधिक्य मिळाले आहे. अक्कलकोट येथे ५ हजार १०० चे मताधिक्य मिळाले आहे़ भाजपचे तालुका अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्या हन्नूर गावी २३५ मते तर जिल्हा परिषदेचे पक्षनेते आनंद तानवडे यांच्या शिरवळ गावी ९०० मतांचे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या कुमठे गावी-३२९, तडवळ-९७१, किणी-५०८, बोरामणी-४३६, कुंभारी-२ हजार १५६, वळसंग-१ हजार ३१७, वागदरी-१ हजार १००, चपळगाव-३१८, मंगरुळ-९७०, नागणसूर-१ हजार ८९९ , माजी चेअरमन विवेकानंद उंबरजे यांच्या नेतृत्वाखाली करजगी येथे ८३९ मतांचे मताधिक्य मिळाले आहे.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात ३५९ बुथ असून, केवळ ४८ बुथवर काँग्रेसला जेमतेम मताधिक्य मिळाले आहे. उर्वरित ३११ ठिकाणी भाजपला मिळाले आहे. भाजपचे डॉ़ जयसिद्धेश्वर महास्वामी यांना १ लाख, २ हजार, ३२३, काँग्रेसचे शिंदे यांना ५६ हजार, ८२५, आंबेडकरांच्या वंचित आघाडीला २६ हजार ३९० असे एकूण मतदान मिळाले आहे. अक्कलकोटच्या इतिहासात प्रथमच भाजपला मताधिक्य मिळाले आहे.
वंचित आघाडीचा फटकावंचित आघाडीमुळे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात हन्नूर, किणी, चपळगाव, चुंगी, सलगर, आचेगाव, मुस्ती, कुंभारी, ब्यागेहळ्ळी, शिरवळ, अक्कलकोट शहर आदी गावात भाजपला फटका बसला आहे तर उर्वरीत बहुतांश गावांत काँग्रेसला जोरदार फटका बसला आहे. एकूणच या निवडणुकीत भाजपला कमी तर काँग्रेसचे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे.