सोलापूर : काँग्रेसने शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांना तर सोलापूर दक्षिण मतदारसंघातून हद्दवाढ भागातील नगरसेवक मौलाली सय्यद उर्फ बाबा मिस्त्री यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बाबा मिस्त्री यांनी रुग्णसेवेच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागात काम केले आहे. त्यामुळे काँग्रेसने त्यांना संधी दिल्याचे सांगण्यात आले.
काँग्रेसने रविवारी सायंकाळी राज्यातील ५१ उमेदवार जाहीर केले. त्यात सोलापूर जिल्ह्यातील दोन उमेदवारांचा समावेश आहे. आमदार प्रणिती शिंदे २००९ पासून शहर मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. २०१४ ची निवडणूक अटीतटीची झाली होती. त्यातही त्यांनी विजय मिळविला होता. प्रणिती तिसºयांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. यंदा या मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांच्यासह नगरसेवक अॅड़ यू. एन. बेरिया यांनी उमेदवारी मागितली होती. काँग्रेसने प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजप-सेना युतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी माजी आमदार दिलीप माने आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे प्रयत्नशील आहेत.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे या जागी कोण उमेदवार असेल याकडे लक्ष होते. नगरसेवक बाबा मिस्त्री म्हणाले, शासकीय आरोग्य विमा योजनेच्या माध्यमातून मी केवळ सोलापूर शहरात नव्हे तर गावागावातील लोक जोडले आहेत. अनेक लोक मला नावाने ओळखतात. काँग्रेसच्या नेत्यांनी हे काम पाहूनच मला उमेदवारी दिली आहे. सोलापूर दक्षिण मतदारसंघात शहरी भागात एक लाख ९० हजार तर ग्रामीण भागातील १ लाख १७ हजार मतदारांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज कधी दाखल करायचा याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहे.
भाजपकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची उमेदवारी निश्चित आहे. देशमुख यांनी होटगी रोडवर आरक्षित जागेत बंगला बांधला आहे. हे प्रकरण उघडकीस आणण्यात बाबा मिस्त्री आणि नगरसेविका परवीन इमानदार यांनी महापालिकेत पाठपुरावा केला होता. आता निवडणुकीच्या मैदानात बाबा मिस्त्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात कशी लढत देतात याकडे लक्ष आहे.
सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात सकाळी रुग्णांची उपचार सेवा बजावणाºया बाबा मिस्त्री यांना मानणारा नई जिंदगी परिसरात मोठा वर्ग आहे.-----------आपकडून खतीब वकील उमेदवारआम आदमी पार्टीने शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून अॅड. खतीब वकील यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
मुहूर्त पाहून भरणार अर्ज
- - काँग्रेसची उमेदवारी जाहीर झालेले बाबा मिस्त्री तथा मौलाली बासूमिया सय्यद यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची संपूर्ण तयारी केली आहे मात्र योग्य मुहूर्त पाहूनच आपण अर्ज दाखल करणार आहोत त्यापूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी सांगितले.
- - सोलापूर महानगरपालिकेत स्थायी समितीचे सभापती पदाने त्यांना अनेकदा हुलकावणी दिली सलग चार टर्म नगरसेवक पदावर काम करूनही त्यांना महानगरपालिकेत कोणतेही मोठे पद मिळाले नाही तरीही पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी प्रभागात विकास कामासाठी निधी आणण्यावर अधिक भर दिला त्यामुळेच महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसची सर्वत्र पडझड होत असताना बाबा मिस्त्री यांनी आपला प्रभाग राखला, त्याचे फळ त्यांना मिळाले आहे.