काँग्रेसला आता चांगले दिवस; लोकांचे काँग्रेस पक्षावरील प्रेम वाढले : सुशिलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:40 PM2018-12-12T12:40:34+5:302018-12-12T12:42:24+5:30
काँग्रेस नेत्यांना आनंद : मोदी सरकारच्या कामकाजावर केली टीका
सोलापूर : काँग्रेसला आता चांगले दिवस आले आहेत. लोकांचे कॉँग्रेस पक्षावरील प्रेम वाढले आहे. राहुल गांधींचे नेतृत्व या देशातील जनतेने स्वीकारल्याचे हे द्योतक आहे. पुढील काळात राहुल गांधीशिवाय आणि काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही, ही भावना लोकांमध्ये चांगली रुजली आहे . काँग्रेसच देशाला तारू शकेल ,असा विश्वास त्यांच्या मनात आता दृढ झाला आहे, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज व्यक्त केली.
तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल शिंदे यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, भाजपा सरकारने लोकांना खूप आश्वासने दिली. दिलेली आश्वासने त्यांना पूर्ण करता आली नाहीत. त्याचा परिणाम या निवडणुकीत भाजपाच्या सरकारला भोगावा लागला. या सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढला, शेतकºयांचे प्रश्न वाढले, हे प्रश्न सोडवण्यात केंद्रातील सरकार अपयशी ठरले. त्याचाही फटका राज्याच्या निवडणुकीत भाजपाला बसला .
मध्य प्रदेशामध्ये व्यापम घोटाळ्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली होती . छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना सरकारने खूप त्रास दिला , म्हणूनच छत्तीसगड चा निकाल इतका एकतर्फी लागला. नक्षलग्रस्त भागातही जनतेला सरकारचा त्रास झाला . त्यामुळे नक्षलींनीही त्यांना विरोधच केला . सर्व आघाड्यांवर केंद्रातील सरकार अपयशी ठरले . तीच स्थिती मध्य प्रदेश,राजस्थान आणि छत्तीसगड सरकारची झाली होती . पंतप्रधानांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाची नेहमीच टिंगलटवाळी केली . ही टिंगल उडविणाºया जनतेनेच दिलेली ही चपराक आहे.
माजी आमदार विश्वनाथ चाकोते म्हणाले, काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा राहुल गांधी यांनी घेतल्यापासून चौफेर संपर्क सुरू केला आहे. त्यांच्या कामाची भाजपवाल्यांनी टिंगल केली. पण या कामाचा भाजपवाल्यांना पाच राज्यातील निवडणुकांमध्ये दिसला आहे. त्यामुळे काँग्रेसला आता अच्छे दिन आले आहेत, असे म्हणावे लागेल. मोदी खोटे बोलून सत्तेवर आले, पण शेवटी सत्याचा विजय होतो. आता या निकालावरून पुढील चित्र काय असेल ते स्पष्टच आहे.
माजी आमदार दिलीप माने म्हणाले, भाजपावाले काँग्रेसमुक्त भारत करू अशी घोषणा देत होते. आजच्या निवडणूक निकालांनी त्यांना उत्तर दिले आहे. देशात २ कोटी रोजगार देऊ असे म्हणाले होते. प्रत्यक्षात तसे काहीही झालेले नाही. नोटबंदी, जीएसटी, मेक इन इंडिया यासारखे जुमले फसलेले आहेत. लोक वैतागलेले आहेत. त्याचा इफेक्ट या निवडणूक निकालाद्वारे दिसून आला आहे. निकालाचा हाच ट्रेंड लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत दिसून येणार आहे.
‘जीएसटी’ राग जनतेने व्यक्त केला
- सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, अच्छे दिनचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी यांनी देशभर सत्ता हस्तगत केली. पण साडेचार वर्षात जनतेला त्यांचे काम कळून चुकले आहे. नोटबंदी, जीएसटीमुळे सामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले. याचा राग या नागरिकांनी व्यक्त केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ही तर आता सुरुवात आहे. यापुढील निवडणुकातही भाजपला फटका बसेल, यात वाद नाही. त्यामुळे आता भाजपला उतरती कळा लागली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.