महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसची सत्ता यावी यासाठी जनसंघर्ष यात्रेतील नेत्यांचे विठ्ठलाला साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 09:49 AM2018-09-04T09:49:12+5:302018-09-04T09:54:46+5:30
सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसची सत्ता यावी व सर्वसामान्यांची सेवा करण्यास संधी द्यावी असे साकडे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेतील प्रमुख नेत्यांनी घातले.
सोलापूर : राज्यातील भाजपा सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसची सत्ता यावी व सर्वसामान्यांची सेवा करण्यास संधी द्यावी असे साकडे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेतील प्रमुख नेत्यांनी घातल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार भारत भालके, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक काँग्रेसचे आजी माजी आमदार, खासदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यात सातत्याने पेट्रोल डिझेलची दरवाढ होत आहे याबाबत अशोक चव्हाण यांना पत्रकारांनी विचारले असता अशोक चव्हाण म्हणाले की, राज्यातील भाजपा सरकारची संवेदनशीलता संपलेली आहे. भाजपा सरकार सर्वसामान्यांना न्याय देऊ शकत नाही. पेट्रोल डिझेल व गॅसच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिक पूर्णपणे संतापलेला असताना भाजपा सरकार याकडे साफ दुर्लक्ष करत आहे. भाजपा सरकारला सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे बघण्यासाठी व ते सोडवण्यासाठी वेळ नसल्याचाही टोला अशोक चव्हाण यांनी लगावला. काँग्रेसची संघर्ष यात्रा पंढरपुरात दाखल झाली असून सकाळी यात्रेतील प्रमुख नेत्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले त्यानंतर आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी भेट दिली.