सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह २५ नेते आज रविवारी सोलापुरात आहेत. या नेत्यांच्या उपस्थितीत दुपारी काँग्रेसचा निर्धार मेळावा हुतात्मा स्मृती मंदिर सभागृह, सोलापूर येथे होत आहे. मेळाव्याच्या अनुषंगाने सोलापुरात काँग्रेसमय वातावरण निर्माण झाले आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातील हजारो कार्यकर्ते मेळाव्याच्या ठिकाणी गर्दी करू लागले आहेत.
देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे नरोटे म्हणाले. तीन माजी मुख्यमंत्र्यांसह माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, राज्याच्या सहनिरीक्षक सोनल पटेल, चंद्रकांत हंडोरे, आमदार भाई जगताप यांच्यासह २५ नेते कार्यक्रमाला हजर असतील. आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून ‘शुभराय आर्ट गॅलरी’चे नूतनीकरण होणार आहे. अशोक चौकात स्पर्धा परीक्षा केंद्राचे काम पूर्ण झाले. या कामांचा शुभारंभ प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे. यानंतर हुतात्मा स्मृती मंदिरात कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा होईल. कार्यक्रमस्थळांवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.