भाजप सरकारच्या विरोधात सोलापूरातील काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 02:27 PM2018-04-05T14:27:28+5:302018-04-05T14:27:28+5:30
काँग्रेसतर्फे दुचाकीची अंत्ययात्रा, भाजप सरकारचा केला निषेध, महागाईने जनता त्रस्त तर नेते व्यस्त
सोलापूर : केंद्र व राज्य सरकारने इंधन दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शहरातून दुचाकीची अंत्ययात्रा काढून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले.
पांजरापोळ चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलनास सुरूवात झाली. आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते गळ्यात गॅस सिलिंडरचे प्रतिकात्मक छायाचित्र लटकाविले होते. तसेच हातात घेतलेल्या फलकावर पेट्रोल, डिझेल दरवाढीबाबत भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला होता.
मोर्चाच्या अग्रभागी एका भंगार स्कूटरला हार घालून तिरडीवर ठेवण्यात आले व ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा आंदोलनाच्या मार्गावरून मार्गस्थ झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी राम नाम सत्य है, मोदी नाम असत्य है अशी घोषणाबाजी करून लक्ष वेधले. आंदोलनात प्रदेश सरचिटणीस धर्मा भोसले, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, नगरसेवक बाबा मिस्त्री, विनोद भोसले, नगरसेविका परवीन इनामदार, लोकसभा युवक अध्यक्ष सुदीप चाकोते, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, बाबा करगुळे, गणेश डोंगरे, महेश घाडगे, संजय गायकवाड, नलिनी चंदेले, अलका राठोड, तिरुपती परकीपंडला, गोविंद कांबळे, सिद्धाराम चाकोते, राहुल वर्धा, अंबादास गुत्तीकोंडा, सोहेल शेख आदी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. समारोपावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कमी असताना सुद्धा पेट्रोल,डिझेल,गॅसची प्रचंड दरवाढ करण्यात आली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. महागाईने जनता त्रस्त तर भाजपा नेते आपल्याच व्यापात व्यस्त आहेत. ही दरवाढ मागे घ्यावी, अशी त्यांनी मागणी केली. इंधन दरवाढीविरूद्ध प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभर आंदोलन उभा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरून या मोर्चाचे नेतृत्व आमदार प्रणिती शिंदे या करणार आहेत, असे काँग्रेस भवनतर्फे सांगण्यात आले होते. पण प्रत्यक्षात मोर्चात आमदार शिंदे व इतर ज्येष्ठ नेत्यांची अनुपस्थिती जाणवली.