सोलापूर: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीच्या (Lakhimpur Kheri Incident) निषेधार्थ महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सरकारने 'महाराष्ट्र बंद' (Maharashtra Bandh) ची हाक दिली आहे. राज्यभरात संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीने पुकारलेल्या संपाला भाजप, मनसेसह अनेकांनी विरोध दर्शवत टीका केली आहे. मात्र, यातच काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी सरकारच्या मग्रुरी विरोधात आम्ही बंद पुकारला असून, आम्ही काय करून दाखवू शकतो हे दाखवण्याचाही आमचा प्रयत्न आहे, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.
भाजप आणि मोदी सरकारला हमारा कोई कुछ नही बिगाड सकता, असे वाटते. ज्या मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले, त्या मंत्र्याने दुसरीकडे उद्घाटनाचे कार्यक्रम घेतले. इतके हे सरकार निगरगट्ट झाले आहे. सरकार देशातील लोकांचा अंत पाहात आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहून आम्ही काय काय करू शकतो, ते दाखवण्याचा प्रयत्न आहे, सरकारच्या मग्रूर पणाच्या विरोधात बंद पुकारला आहे, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या.
लोकांचा संताप समजून घ्या
बंद दरम्यान बसेस फुटतील. पण कोणत्या बसेस फुटल्या माहिती नाही. लोकांचा संताप समजून घेतला पाहिजे, असे सांगतानाच तिन्ही पक्ष पूर्ण ताकदीने बंद होण्याने उतरले आहेत. लोक बंदमध्ये उत्सफूर्तपणे उतरले आहेत. बंदमध्ये ज्या काही किरकोळ घटना घडतात त्या जगभरात होत असतात, असेही राऊत यांनी म्हटले आहे. देशातील शेतकरी बंदकडे पाहत आहे. देशातील शेतकऱ्यांची लढाई महाराष्ट्र लढत आहे. दीड वर्षापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन करताना ४०० पेक्षा अधिक शेतकरी मरण पावले आहेत. हरियाणात भाजपच्या राज्यात काही शेतकऱ्यांचे डोके फोडले आहे. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना चिरडून मारले आहे. शेतकरी आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहे. म्हणून महाराष्ट्राने बंद पुकारला आहे. बंद सुरू आहे. बंद शंभर टक्के यशस्वी आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, लोकसभेत शेतकरी विरोधातील विधेयक पास होताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून गप्प का बसले होते? राज्यसभेत शरद पवार अनुपस्थित का होते? या सगळ्यांची उत्तरे द्यावी लागतील. उत्तर प्रदेशातील घटना निषेधार्थ आहेत. लॉकडाऊनमुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. निषेध करायचा असेल तर एक दिवसाचे अधिवेशन बोलवा. घटनेच्याविरोधात ठराव करा. चर्चा करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत जाणार. पंतप्रधान मोदींशी बोलणार. तुमचे संबंध चांगले आहेत असे बोलणार मग तुमच्या राजकारणासाठी महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरणार हे कसले राजकारण? असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सरकारला केला आहे.