काँग्रेस म्हणते, हा तर सुशीलकुमारांचाच प्रकल्प; शिवसेनेच्या नेत्यांमध्येही उड्डाण पुलावरुन दोन गट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 11:54 AM2019-12-26T11:54:45+5:302019-12-26T11:57:27+5:30
कशी फुटणार कोंडी : कोठेंनी यापूर्वी विरोध नोंदवला, कधी मिळणार निधी
राकेश कदम
सोलापूर : शहरात उड्डाण पूल गरजेचा आहे. मूठभर लोकांच्या मिळकती बाधित होतील म्हणून त्याला विरोध करणे चुकीचे आहे, असे भाजपचे नेते बोलत आहेत. हा तर सुशीलकुमार शिंदे यांचा प्रकल्प होता. पण आता त्याला प्राधान्य नको, असे काँग्रेसचे नेते म्हणत आहेत. शिवसेनेत या विषयावरुन दुफळी आहे. राष्ट्रवादी पूर्णपणे विरोधात आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी आवश्यक निधी कसा मिळणार, याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे.
उड्डाण पुलाच्या भूसंपादनाचे काम संथगतीने सुरू आहे. राज्यातील सरकार बदलल्यानंतर काँग्रेसने या प्रकल्पाला थेट विरोध केला आहे. त्यामुळे भविष्यात भूसंपादनासाठी आवश्यक असलेला निधी मिळेल की नाही, याची चर्चा सुरू आहे. उड्डाण पुलाच्या कामात अनेक आजी-माजी नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मिळकती बाधित होणार आहेत. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप नगरसेवकांचाही समावेश आहे. दोन देशमुखांनी पुढाकार घेतल्याने भाजपचे नगरसेवक यावर फार बोलायला तयार नाहीत. शिवसेनेत मतभेद दिसत आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा मनपातील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी महापालिकेच्या सभेत उड्डाण पुलास विरोध केला आहे. सेनेचे इतर नगरसेवक मात्र उड्डाण पुलाच्या बाजूने आहेत. या गोंधळात शहरातील वाहतुकीची वस्तुस्थिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचेल का? पोहोचली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे इतर नेते त्याला साथ देतील का?, अशीही चर्चा आहे.
ठोंगे-पाटील, वानकर म्हणाले, आम्ही पाठपुरावा करू
- शहरात उड्डाण पूल गरजेचा आहे. साखर कारखाने, सिमेंट कारखाने, मेडिकल हब यामुळे शहरात वाहनांची गर्दी वाढत राहील. आज केंद्र सरकारने पैसे दिलेत. उद्या किंमत वाढल्यास मिळतील की नाही याची शाश्वती नाही. मग कशाला विरोध करायचा. आमच्यातील काही लोक शहर विकासाऐवजी नातेवाईकांच्या हिताला प्राधान्य देतात. नातेवाईकांच्या जमिनी जातील म्हणून काही लोक विरोध करीत आहेत. हे बरोबर नाही.
- लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, सहसंपर्कप्रमुख, शिवसेना.
उड्डाण पुलाचे भूसंपादन सुरू झाले. ते कशाला थांबवायचे. प्रथम बाह्यवळण रस्ते व्हायला हवेत. त्यासोबत उड्डाण पुलाचे काम थांबू नये. भूसंपादनासाठी आवश्यक असलेला उर्वरित निधी आणण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि डॉ. तानाजी सावंत यांची भेट घेऊ.
गणेश वानकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना.