काँग्रेस तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं फोडणार 'भाजप अन् राष्ट्रवादी'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 09:17 AM2023-05-16T09:17:46+5:302023-05-16T09:18:26+5:30
काँग्रेसच्या उमरगा येथील एका नेत्याच्या कुटुंबातील विवाह सोहळा रविवारी होणार आहे
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर काँग्रेसचे नेते शहरातील राजकीय वातावरण तापविणार आहेत. काँग्रेसचे तीन माजी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि युवा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रविवार, २१ मे रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. यावेळी भाजप, राष्ट्रवादी आणि एमआयएममधील काही नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश व्हावा, यासाठी पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. हा मेळावा म्हणजे काँग्रेसची लोकसभा निवडणुकीची तयारी मानली जात आहे. शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी या घडामोडींना काहीसा दुजोरा दिला आहे.
काँग्रेसच्या उमरगा येथील एका नेत्याच्या कुटुंबातील विवाह सोहळा रविवारी होणार आहे. यासाठी काँग्रेसचे बडे नेते सोलापुरातून उमरगा येथे जाणार आहेत. तत्पूर्वी रविवारी दुपारी ११ वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा होईल.
माजी नगरसेवकांसोबत बोलणी सुरू
भाजपचे कोळी समाजातील एक नेते गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या संपर्काति आहेत. शहर उत्तर मतदारसंघाच्या राजकारणात त्यांची घुसमट होत असल्याचे सांगण्यात येते. जनसंघाच्या काळापासून सक्रिय असलेला या नेत्याची व्यथा शहरातील आमदार, खासदार आणि प्रदेश पातळीवरच्या नेत्यांपर्यंत पोहोचली. मात्र, म्हणावा तसा प्रतिसाद न आल्यामुळे या नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. या नेत्यासोबत काही माजी नगरसेवकांसोबत बोलणी सरु असल्याचे सांगण्यात आले
काँग्रेस कार्यकर्त्यांचा रविवारी जाहीर मेळावा होईल. आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तयारी सुरु आहे. या मेळाव्यात नव्या घडामोडी पाहायला मिळतील.
चेतन नरोटे,
शहराध्यक्ष काँग्रेस