नागरी समस्यांसाठी कॉंग्रेसचा महापालिकेवर निघणार जनआक्रोश मोर्चा
By संताजी शिंदे | Published: August 26, 2023 02:16 PM2023-08-26T14:16:46+5:302023-08-26T14:17:10+5:30
सोलापूर : नागरी समस्यासाठी जनतेच्या प्रश्नासाठी सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीने भाजप सरकार व महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात ...
सोलापूर : नागरी समस्यासाठी जनतेच्या प्रश्नासाठी सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीने भाजप सरकार व महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा मंगळवार २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता चार पुतळा येथून महानगरपालिकेपर्यंत निघणार आहे अशी माहिती युवक कॉंग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी दिली.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आमदार प्रणिती शिंदे, महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे, काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, बाबा मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. गेल्या सहा वर्षांपूर्वी सोलापूर शहरातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या खोट्या आश्वासनावर बळी पडून महापालिका सत्ता दिली. तसेच राज्यात, केंद्रात, सुद्धा भाजपची सत्ता आहे. पण सत्तेत आल्यानंतर त्यांना त्यांच्या आश्वासनाचा विसर पडला.
रोज शहराला पाणीपुरवठा करतो म्हणून आश्वासन दिलेल्या भाजपने प्रत्यक्षात मात्र, सात ते आठ दिवसात पाणीपुरवठा अपुरा, गडूळ, कमी दाबाने पाणीपुरवठा करत आहेत. दिवाबत्तीची सोय नाही. रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते अशी शहराची अवस्था झाली आहे. यामुळे अनेकांचे अपघात होऊन बळी व कायम अपंग झाले आहेत. घंटागाडी वेळेवर येत नाही. महापालिका दवाखान्यात औषधांची सोय नाही या सर्व समस्यांसाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे असे गणेश डोंगरे यांनी सांगितले.