सोलापूर : कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीचा काँग्रेस पक्षाने १३५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. मिळालेल्या विजयामुळे शहर काँग्रेसच्या वतीने शहरात जल्लोष करण्यात आला. जल्लोषामध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचाही सहभाग घेतला होता.
सोलापुरात भारतीय जनता पार्टी ज्या बाळीवेस चौकात विजयी सभा घेते त्या ठिकाणी जाऊन काँग्रेस पक्षाने मनसोक्त जल्लोष केला. गुलालाची मुक्त उधळण, काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेचे झेंडे नाचवत, मिठाई वाटत, फटाके फोडत नेत्यांनी हलगी वर ठेका धरला होता. यावेळी बोलताना काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, हा विजय महागाईच्या व भ्रष्टाचाराच्या विरोधातला आहे.
आमदार प्रणिती शिंदे या ज्या ठिकाणी प्रचाराला गेल्या होत्या त्या भागातील पाच जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. या विजयामुळे काँग्रेसने दक्षिण मधील भाजपचे दार बंद केले आहे. काँग्रेसने बजरंग दलाला विरोध केला, त्यामुळे 'बजरंग बली' काँग्रेस सोबत राहिले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता ही बदलाची नांदी आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर निश्चितच राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान होतील असा दावा नरोटे यांनी केला.
विजय जल्लोषात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव, शिवसेना शहर प्रमुख विष्णू कारमपुरी, माजी नगरसेवक विनोद भोसले, तौफिक हातुरे, विश्वनाथ चाकोते, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी महापौर सुशीला आबुटे शहराध्यक्ष हेमा चिंचोळकर, संध्या काळे, श्रीशैल रणधिरे, नाना क्षीरसागर, अंबादास करगुळे, वाहिद विजापुरे, तिरुपती परकीपंडला, सिद्धाराम चाकोते यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.