पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची माहिती
पंढरपूर - वारी मार्गावरील गावांचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश करुन सर्व गावांच्या पाणी पुरविण्यासाठी एकत्रित योजना करण्याचा विचार असून जिल्हा परषिदेने त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा अशा सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या़.पंढरपूर आषाढी यात्रा, पाणीपुरवठा आणि स्वच्छ भारत मिशनबाबत शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक झाली. या बैठकीत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजय देशमुख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड, आमदार प्रशांत परिचारक आदी पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी सांगितले की, वारी मार्गावरील प्रत्येक गावात स्वच्छ पाणीपुरवठा केला जाण्यासाठी या सर्व गावांचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश करण्यात यावा. त्यानंतर या सर्व गावांच्या पाणीपुरवठ्याची एकत्रित जाळे केले जाईल. त्यामुळे वारी मार्गावरील गावात स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा होईल.यंदाची वारी निर्मल वारी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाच्या सर्व संबंधित यंत्रणांनी सज्ज रहावे, पालखीचा मुक्काम ज्या गावात आहे त्या गावात पायाभूत सुविधा पुरवा. पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, वीज पुरवठा आदी सुविधांची प्रत्यक्ष मुक्काच्या ठिकाणी जाऊन पहाणी करा अशा सूचनाही पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी दिल्या. मराठवाडा, विदर्भ येथून येणा-या पालख्यांसाठीही चोख व्यवस्था ठेवण्यात यावी अशा सूचना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.निर्मल वारी करण्यासाठी पालखीच्या मुक्कामाच्या गावात मोबईल टॉयलेट पुरविण्यात येणार आहे. या टॉयलेटचा वापर केला जावा यासाठी पालखी तळांच्या शजारील गावातील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एनएसएसचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणुन काम करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे यांनी सांगितले. पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात ठेवण्यात येणा-या स्वच्छतेच्या आराखड्याची माहिती दिली. यात्रा काळात शहरात ठिकठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यात आली आहेत. त्याचबरोबर मोबाईल टॉयलेटही उभारण्यात आली असल्याचे बापट यांनी सांगितले.बैठकीस सोमपा आयुक्त विजय काळम-पाटील, जि़प़चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र अहिरे, पंढरपूर प्रांत संजय तेली, महसूल उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी, पंढरपूर तहसीलदार नागेश पाटील, मुख्याधिकारी अभिजीत बापट, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप अभियंता सतीश सुर्यवंशी आदी उपस्थित होते.